सध्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वरा अभिनयापेक्षा तिच्या खळबळजनक विधानांमुळेच जास्त चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वीच तिने एका मुलाखती दरम्यान एका चार वर्षांच्या मुलाला शिवी दिल्याची कबुली दिली होती. त्या मुलाने तिला ‘आंटी’ अशी हाक मारली, म्हणून तिने त्याला शिवी दिली होती. हा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर स्वराला यूजर्सने मोठ्याप्रमाणावर ट्रोल करण्यास सुरूवात केली. तर, आता तिच्याविरोधात ‘बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग'(एनसीपीसीआर) मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाय स्वरा भास्करला कधीही अटक होऊ शकते असे देखील तक्रारदाराने म्हटले आहे.

‘सन ऑफ अबिश’ नावाच्या एका शोमध्ये स्वरा भास्करला गप्पा मारण्यासाठी बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात सूत्रसंचालकाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली? याबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने हा वादग्रस्त किस्सा सांगितला होता.

स्वराने एका जाहिरातीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. दाक्षिणात्य भाषेमध्ये ही साबणाची जाहिरात तयार झाली होती. या जाहिरातीमध्ये स्वरासोबत एक चार वर्षांचा बालकलाकार देखील होता. त्याने स्वराला बघून ‘आंटी’ अशी हाक मारली. हा किस्सा सांगत असताना स्वराने म्हटले की, “माझ्या करिअरला सुरूवातही झाली नव्हती आणि या ‘#$%’ (शिवी) मुलाने मला आंटी म्हणून हाक मारली. त्यावेळी मी पहिल्यांदाच कॅमेरासमोर अभिनय करत असल्यामुळे प्रचंड दबावात होते. त्याला लघुशंका करण्यासाठी जायचे होते. त्याने जाहिरातीच्या दिग्दर्शकाला याबाबत सांगितले. मात्र त्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. अखेर त्याने मला आंटी अशी हाक मारुन याबाबत माहिती दिली. त्याने आंटी म्हणताच मी त्याच्यावर चिडले आणि त्याला शिवी दिली. या घटनेमुळे जाहिरातीसाठी मी घेतलेली मेहनत पाण्यात गेली असेच मला वाटले.”

भाजपाचे दिल्लीतील कार्यकर्ते आकाश जोशी यांनी स्वरा भास्कर विरोधात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे आकाश जोशी यांनी ट्विटवर तक्रार दाखल केल्याचे पत्र देखील शेअर केले आहे. तर ट्विटरवरील पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”स्वरा भास्कर विरोधात मी बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. कधीही होऊ शकते स्वरा भास्करला अटक” असे म्हटले आहे.

याशिवाय एका स्वयंसेवी संस्थेच्या अधिकृत ट्विटरद्वारे सांगण्यात आले आहे की, स्वरा भास्कर नावाच्या अभिनेत्राविरोधात एका टीव्ही कार्यक्रमात भारताच्या दक्षिण भागातील मुलांबद्दल वर्णद्वेषी आणि भेदभाव करणाऱी टिप्पणी केल्याबद्दल ‘एनसीपीसीआर’कडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, सर्व ऑनलाइन अकाउंटवरून हा व्हिडीओ हटवण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.