स्वरा भास्करने आतापर्यंत ‘तनु वेडस मनु’ , ‘रांझना’ यांसारख्या चित्रपटांतून सहकलाकाराच्या भूमिकांमुळे आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. प्रादेशिक किंवा दुय्यम दर्जाचे चित्रपट वगळता स्वरा भास्करला मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळालेली नाही. स्वत: स्वरा भास्कर हिलासुद्धा तिच्या अशाप्रकारच्या मर्यादांची पूर्णपणे जाणीव आहे. तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीत बाहेरच्या गटातले असता, तेव्हा तुमचा प्रवास वेगळ्या दिशेने होणार हे अगोदरच निश्चित असल्याचे स्वराने म्हटले आहे. मला माहितीये की, मला पडद्यावर कधीही सलमान खानबरोबर मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळणार नाही. मी मिस इंडियासारखी सौदर्यस्पर्धा जिंकलेली नाही किंवा मी इंडस्ट्रीतील कोणत्याही कुटुंबातून आली नसल्यामुळे मला कधीही मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळणार नाही असे स्वराने सांगितले. परंतु, आजपर्यंत बॉलीवूडच्या दोन व्यवसायिक चित्रपटांत मला चांगल्या दर्जाच्या भूमिका करायला मिळाल्यामुळे मी समाधानी असल्याचे तिचे म्हणणे आहे. रांझना नंतर चित्रपटांच्या भूमिका निवडताना मी फार चोखंदळ झाली असल्याचे स्वराने सांगितले आहे.