ट्विटरवर सध्या पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया ट्रेंडिंगला आहे. पाकिस्तानने भारताला मदत करण्याची तयारी दाखवल्याने नेटकऱ्यांकडून त्यांचं कौतुक होत आहे. अभिनेत्री स्वरा भास्करनेही आपल्या शेजारी राष्ट्राचं कौतुक केलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान म्हणाले की दोन्ही देशांनी या जागतिक समस्येला तोंड द्यायला हवं. त्यासाठी माणुसकीचा आधार घ्यायला हवा. त्यानंतर पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शोएब अख्तरनेही आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून पाकिस्तान सरकारला तसंच चाहत्यांना भारताला या करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मदत करण्याचं आवाहन केलं होतं. तो म्हणाला होता की अशा परिस्थितीत संपूर्ण जगाने भारताला मदत करणं गरजेचं आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करने पाकिस्तानच्या या भूमिकेचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “पाकिस्तानमधला समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतासाठी पुढे येत आहे हे काळजाला भिडणारं आहे. अशा या परिस्थितीत पाकिस्तान पुढे येत आहे हे सत्य माहित असूनही की भारतीय मीडिया आणि जनता कायम पाकिस्तानची खलनायकी प्रतिमा रंगवत आहे. मन मोठं केल्याबद्दल तुमचे आभार शेजाऱ्यांनो!”

पाकिस्तानी कलाकार मोमीना मुस्तेहसन हिनेही भारताची मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं होतं.

भारतात गेल्या २४ तासात ३ लाख ४९ हजार ३९१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २,७६७ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्येपैकी ५४ टक्के रुग्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि केरळ या राज्यातील असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. दिल्लीतल्या काही रुग्णालयांमध्ये सध्या वैद्यकीय सुविधांची कमतरता भासू लागली आहे.