बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करची अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळख असून, आता तिने अभिनयापलीकडे आपल्या कामाची कक्षा रुंदावली आहे. बहुचर्चित ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात अभिनय करणाऱ्या स्वराने आता कथा लेखनाकडे मोर्चा वळवला आहे. ‘स्प्लिट एंडस्’ या तिच्या कथेला ‘एशिया सोसायटी इंडिया सेंटर न्यू व्हॉइस फेलोशिप फॉर स्क्रिनरायटर्स २०१५-१६’ (एनव्हिएफएस) साठीच्या अंतिम १३ कथांपैकी एक होण्याचा मान मिळाला आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या स्वराला ‘एशिया सोसायटी इंडिया सेंटर’ची विजेती होण्याचा मान मिळाला आहे. भारतातील निवडक सात प्रतिभाशाली आणि स्वतंत्रपणे पटकथा लेखन करणाऱ्या लेखकांना उत्तेजना देण्यासाठी हा प्रपंच राबविण्यात आला होता. आपल्या पटकथेवर काम करण्यासाठी विजेत्यांना २ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. निवड समितीच्या मते स्वराने लिहिलेली कथा ही आकर्षक आणि मुळ स्वरुपातील आहे. २०११ साली लिहिण्यास सुरुवात केलेल्या ‘स्प्लिट एण्डस्’ कथेस स्वराकडून वर्षागणिक नवे आयाम देण्यात आले. आपण साहित्यिक शिक्षण घेतल्याचे सांगत, लेखन शैलीला वाव देण्याची इच्छा तिने व्यक्त केली. आपली आगामी कथा ही विनोदीकथा असू शकते, अशी शक्यतादेखील तिने वर्तवली.