अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वातील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चिला जात आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून ती हत्याच आहे, असं अभिनेत्रीने कंगना रणौतने म्हटलं होतं. त्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका मुलाखतीत बोलत असताना कंगनाने अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्वरा भास्करवरदेखील भाष्य केलं होतं. त्यानंतर या तिघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, या घटनेनंतर स्वरा भास्करने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

“आत्मनिरीक्षण करण्याची खरं तर ही वेळ आहे. आपल्याला सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांची माफी मागण्याची गरज आहे. आपल्या वादात कितीतरी वेळा त्यांनी त्याच्या नावाचा उल्लेख ऐकला असेल. सुशांतचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याच्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे, ते क्षण आनंदाने पाहिले पाहिजेत आणि जे झालं ते विसरलं पाहिजे”, असं स्वरा म्हणाली.

कंगनाने तापसी आणि स्वरावर ताशेरे ओढल्यानंतर या तिघांमध्ये चांगलेच शाब्दिक वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. काही मुलाखती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप केले होते.

काय म्हणाली होती कंगना?
“या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी फक्त गमावू शकते. कारण मला माहितीये, उद्या ही मूव्ही माफिया गँग बाहेरून आलेल्या तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या २० कलाकारांना समोर आणेल. आणि हे कलाकार फक्त कंगनालाच घराणेशाहीचा त्रास होतो पण आमचं करण जोहरवर प्रेम आहे असं म्हणतील. जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात? तुम्ही तर आलिया भट्ट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगले दिसता. तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात. तरी तुम्हाला काम का मिळत नाही. तुमचं पूर्ण अस्तित्वच घराणेशाहीचा पुरावा आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूश आहात हे मला का सांगताय? मला माहितीये की भविष्यात असंच होईल आणि संपूर्ण सिस्टम मला वेडं ठरवेल”, असं कंगना या मुलाखतीत म्हणाली होती.