रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिका पुन्हा सुरू झाल्यानंतर आता प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता लॉकडाउनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या ३० मार्चपासून ही मालिका पुन्हा सुरू होत आहे. ३० मार्च रोजी मालिकेचा पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होईल. दुपारी ४ वाजता ही मालिका प्रसारित होईल. त्यानंतर दररोज ४ ते ८ या वेळेत ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेत अभिनेता अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे. कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे.

या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले.

करोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. लोकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. अनिश्चित काळासाठी सर्व शूटिंग रद्द केले गेले आहेत. अशा वेळी मनोरंजनासाठी जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जात आहेत. दूरदर्शनवर शनिवारपासून ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘व्योमकेश बक्षी’ आणि ‘सर्कस’ या मालिका पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत. त्यानंतर आता झी मराठी वाहिनीनेही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swarajyarakshak sambhaji marathi serial to telecast again during lockdown period ssv
First published on: 28-03-2020 at 19:54 IST