शांता शेळके, ग. दि. माडगूळकर यांच्यासारख्या मराठीतील दिग्गज साहित्यिकांच्या शब्दांना सुधीर फडके अर्थात बाबूजींनी स्वरांचा साज चढविला. दिग्गजांच्या शब्दांची आणि सुरांची ही गुंफण जेव्हा तितक्याच तोडीचा गायक अल्लदपणे उलगडतो तेव्हा तो मणिकांचनयोगच म्हणायला हवा. शनिवारी रात्री साठय़े महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीत या योगाची अनुभूती पार्लेकरांना घेता आली. निमित्त होते, सुरेश वाडकर यांनी सादर केलेल्या ‘मला भावलेले बाबूजी’ या कार्यक्रमाचे.
‘स्वरंगधार’ आणि ‘लोकसत्ता’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भावगीत, भक्तिगीत, प्रेमगीत, लावणी अशा संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मुक्त विहार करून बाबूजींनी रचलेल्या विविध रचना सादर करण्यात आल्या. सुरेश वाडकर यांच्या कसलेल्या आवाजातून या रचना ऐकण्याची ही पहिलीच वेळ.
‘बाबूजींची गाणी गाताना पोटात गोळा येतो. हीच गाणी मी अधिक चांगल्या पद्धतीने गाऊ शकेन. काही ठिकाणी चुका होत आहेत. पण, पहिलाच प्रयत्न असल्याने तो गोड मानून घ्या,’ अशा शब्दांत वाडकर अधूनमधून आपल्यावर आलेल्या दडपणाची जाणीव रसिकांना करून देत होते. पण, त्यांची ही भीती किती फोल होती हे त्यांच्या एकापेक्षा एक सरस अशा सादरीकरणातून दिसून आले. या वेळी वाडकर यांना साथ दिली गायिका सोनाली कर्णिक हिने.
‘गुरू चरणी’ या गुरुवंदनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची रंगत ‘थकले रे नंदलाला’, ‘हा माझा मार्ग एकला, ‘एक धागा सुखाचा’, ‘सखी मंद झाल्या तारका अशा एकापेक्षा एका सरस गाण्यांनी वाढत गेली. त्यावर कळस केला तो ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाने. बाबूजींच्या विविध प्रकारच्या रचितांनी श्रोत्यांना वेगवेगळी अनुभूती दिली. बाबूजींच्या स्वरातून फुललेल्या शांता शेळके यांच्या ‘तोच चंद्रमा’ने रसिकांना कधी गोड आठवणींच्या अवकाशात विहार करायला लावले. तर ‘पराधीन आहे जगती’ या गीतरामायणात दशरथाची व्याकुळता मांडणाऱ्या गदिमारचित गाण्याने तत्त्वज्ञानाच्या खोल सागरात डुंबविले. ‘आकाशी झेप घे रे’, ‘देव देव्हाऱ्यात नाही’, ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या एकापाठोपाठ सादर करण्यात आलेल्या गीतांनी आध्यात्मिकतेची डूब दिली.
बाबूजींच्या गाण्यांचे वैशिष्टय़ तसेच त्यांच्या रचनेमागील इतिहास नेमक्या आणि हळुवार शब्दांत उलगडत धनश्री लेले यांनी सूत्रसंचालकाची कामगिरी अतिशय जबाबदारीने पेलली. बाबूजींना कित्येक गाण्यात हार्मोनियमवर साथ देणारे बुजुर्ग कलाकार अप्पा वढावकरदेखील रंगमंचावर उपस्थित होते.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टार युनियन, इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स लाइफ इन्शुरन्स आदी प्रायोजक या कार्यक्रमाला लाभले. संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके, मनसेचे शिरीष पारकर या वेळी पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बाबूजींचे स्कूल
बाबूजींच्या गाण्यातून तुमच्यासारख्या तरुणांना काय मिळते, या प्रश्नावर कार्यक्रमाचे संगीत संयोजक अविनाश चंद्रचूड यांनी दिलेले उत्तर बाबूजींच्या गायकीचे आणि संगीताचे वैशिष्टय़ थोडक्यात उलगडणारे होते. ‘बाबूजींनी अनेक गाण्यात ‘सिंफनी’ आणि ‘मेलडी’चा अफलातून संयोग साधला. त्यामुळे त्यांची गाणी आजही टवटवीत वाटतात. त्यांचे हे प्रयोगच आजच्या संगीताचे मुख्य प्रवाह बनले आहेत. त्या अर्थाने बाबूजी म्हणजे एक संगीत स्कूल होते,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.