अभिनेता स्वप्नील जोशी व नीना कुळकर्णी यांच्या अभिनयाने नटलेला ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत १.४६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘गेम ओव्हर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘गेम ओव्हर’च्या हिंदी चित्रपटाने तीन दिवसांत केवळ २ कोटींची कमाई केली आहे. स्वप्नीलच्या ‘मोगरा फुलला’ चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा हा चित्रपट आहे.

स्वप्नीलच्या ‘मोगरा फुलला’ चित्रपटाने शुक्रवारी ३८ लाख, शनिवारी ५६ लाख व रविवारी ५२ लाख रुपयांची कमाई केली. रविवारी विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होता. तरीसुद्धा चित्रपटाने चांगली कमाई केली. तर दुसरीकडे तापसीच्या ‘गेम ओव्हर’ने शुक्रवारी ३८ लाख, शनिवारी ८८ लाख व रविवारी ७४ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. तापसीचा चित्रपट हिंदी, तमिळ व तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला. तिन्ही भाषांची कमाई पाहिली तरी जेमतेम ४.९५ कोटी रुपये कमावले आहेत.

‘मोगरा फुलला’मध्ये स्वप्नीलसोबतच नीना कुळकर्णी, संदिप पाठक, चंद्रकांत कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्रावणी देवधर यांनी बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन केलं आहे. लग्नाचे वय निघून गेलेली मध्यमवर्गीय व्यक्ती जेव्हा एखाद्याच्या प्रेमात पडते तेव्हा आजूबाजूच्या लोकांची, घरातल्यांची काय प्रतिक्रिया असते, त्याचे प्रेम त्याला मिळते का? असे या चित्रपटाचे कथानक आहे. विशेष म्हणजे, प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद बघून मोगरा फुललाच्या शोजमध्ये वाढ करण्यात आली आहे.