हॉलीवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टॅलॉन ऊर्फ रॅम्बोच्या मृत्यूची बातमी पसरली आणि चाहत्यांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. प्रत्येकजण आश्चर्य, दु:ख, श्रद्धांजली यांसारख्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून देऊ लागला. दरम्यान, सिल्वेस्टरने मी जिवंत आहे. कृपया माझ्या मृत्यूच्या खोटय़ा बातम्या पसरवणे थांबवा, असे ट्वीट करून आपल्या जिवंतपणाची ग्वाही दिली. परंतु त्याच्या या प्रतिक्रियेमुळे खऱ्याखोटय़ा बातम्यांचा आणखीनच गोंधळ समाजमाध्यमांवर माजला. दरम्यान, आपल्या भावाच्या मृत्यूच्या अफवा पसरवल्या जात असल्याने सिल्वेस्टरचा मोठा भाऊ  फ्रँक भयंकर संतापला आहे. सिल्वेस्टरच्या मृत्यूची बातमी कळताच वृत्तमाध्यमांनी माहितीची पुष्टी करण्यासाठी फ्रँक यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांचा पारा आणखीनच चढला. विकृत मानसिकतेच्या लोकांनी माझ्या भावाच्या मृत्यूच्या अफवा पसरवणे थांबवा अन्यथा परिणाम वाईट होतील. रॉकी जिवंत असून खोटय़ा बातम्या पसरवणाऱ्यांना गजाआड पाठवल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत, अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली. इंटरनेट हा माहितीचा उत्तम स्रोत आहे, परंतु काही मंडळी आपल्या वैयक्तिक नफ्यासाठी त्यावर चुकीची माहिती पसरवतात. आजवर ब्रिटनी स्पिअर्स, एक्सल रोझ, सीझर मिलन, बेट्टी व्हाईट यांसारख्या अनेक मोठय़ा कलाकारांच्या मृत्यूच्या खोटय़ा बातम्या इंटरनेट माध्यमातून पसरवण्यात आल्या आहेत. या यादीत आता सिल्वेस्टर स्टॅलॉनचीदेखील भर पडली. त्याने या संदर्भात पोलीस तक्रार केली असून लवकरच अशा गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील असा त्याचा विश्वास आहे.