|| स्वप्निल घंगाळे

हॉलीवूडमधील सिनेमे पाहणारा भारतामध्ये बराच मोठा वर्ग आहे मग अगदी सुपरहिरो सिनेमा असो किंवा अगदी साधे सिनेमे. पण न पाहणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. असं असलं तरी हॉलीवूडमधील काही नावं आणि कलाकार हे सर्वसामान्यांनाही चांगलेच परिचयाचे आहेत. म्हणजे जॅकी चेन, सिल्वेस्टर स्टॅलोन,अर्नाल्ड, ब्रुस ली, ब्रॅड पिट, लिओनार्दो अशी कितीतरी नावे भारतीयांना चांगलीच ठाऊक आहेत. त्यासाठी त्यांचा सिनेमा फॉलो करण्याची गरज नाही. याच लोकप्रिय नावांपैकी एक असणारे नाव म्हणजे हॉलीवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन आणि त्याचे ‘रॅम्बो’पट. सिल्वेस्टर स्टॅलोनची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘रॅम्बो’ चित्रपट मालिकेतील ‘रॅम्बो लास्ट ब्लड’ हा अखेरचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमामध्ये ७३ वर्षांचा सिल्वेस्टर अ‍ॅक्शन दृश्ये करताना दिसतो आहे.

हॉलीवूडमध्ये चित्रपटांची मालिका निघण्याचा प्रकार जास्त प्रचलित नव्हता, त्या काळात म्हणजे १९८२ ला ‘रॅम्बो’ चित्रपट मालिकेतील पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सिल्वेस्टरचे वय होते ३६ वर्षे म्हणजे आताच्या वयाहून अर्धे. त्यावेळीही सिल्वेस्टरने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. रॅम्बो सिरिजमध्ये ‘रॅम्बो फर्स्ट ब्लड’ (१८८२), ‘रॅम्बो फर्स्ट ब्लड पार्ट टू’ (१९८५), ‘रॅम्बो थ्री’(१९८८), ‘रॅम्बो’(२००८) आणि आता प्रदर्शित झालेला ‘रॅम्बो लास्ट ब्लड’ या सिनेमांचा समावेश आहे. अमेरिकन सैनिक जॉन रॅम्बोची अ‍ॅक्शनपॅक साहस कथा या सिनेमांमधून दाखवण्यात आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमात रॅम्बो निवृत्त लष्करी सैनिक असल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिएतनाम युद्धामध्ये सहभागी झाल्यानंतर देशसेवेसाठी वेगवेगळ्या मोहिमा हातात घेणाऱ्या रॅम्बोची कथा लास्ट ब्लड या चित्रपटातून संपणार असल्याचे बोलले जाते आहे.

रॅम्बो चित्रपट मालिकेतील पहिल्या चित्रपटापासून म्हणजे ‘रॅम्बो फर्स्ट ब्लड’, ‘रॅम्बो फर्स्ट ब्लड पार्ट टू’, ‘रॅम्बो थ्री’ हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले. अगदी त्यानंतर म्हणजे १९८८ साली ‘रॅम्बो थ्री’ प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी ‘रॅम्बो’ (२००८) प्रदर्शित झाला. मात्र तरीही सिल्वेस्टरच्या रॅम्बोचे चाहते असणाऱ्यांसाठी ती पर्वणी ठरली. आताही पुन्हा ११ वर्षांनी नवा रॅम्बोपट प्रेक्षकांसमोर आला आहे. या सिनेमात रॅम्बो मॅक्सिकोमध्ये मित्राच्या मुलीला वाचवण्याच्या मोहिमेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हॉलीवूडमध्ये प्रचंड यशस्वी ठरलेल्या सिनेमांमध्ये रॅम्बो सिनेमांचे नाव आवर्जून घेतले जाते. शस्त्रास्त्रे, अ‍ॅक्शन दृश्ये, गाडय़ा, युद्ध, सैन्यातील अधिकाऱ्यांच्याही एकमेकांवरच्या कुरघोडय़ा, सत्तासंघर्ष असा टिपिकल हॉलीवूड स्टाइल अ‍ॅक्शनपट असणाऱ्या रॅम्बोचे वेड लोकांमध्ये आजही कायम आहे. मागील ३६ वर्षांपासून सुरू असणारी रॅम्बोची लढाई आता थांबते आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. रॅम्बोची कथा पुढे जाणार की नाही?, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना चित्रपट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सिल्वेस्टरला हा रॅम्बोचा शेवट असेल का?, असा सवाल विचारण्यात आला असता त्याने ‘बघू मला आताही रॅम्बो साकारताना आनंद मिळाला आहे. माझ्यासाठी तर रॅम्बो हाच सिनेमा शेवटचा असेल असं वाटलं होतं, पण आता ‘रॅम्बो लास्ट ब्लड’ हा सिनेमा प्रदर्शित होत असून त्याबद्दल मी उत्सुक आहे,’ असं उत्तर त्याने दिलं आहे. त्यामुळे या सिनेमाचा पुढचा भाग पहिल्या भागाप्रमाणेच नावाच्या पुढे दोन लावून म्हणजेच ‘रॅम्बो लास्ट ब्लड पार्ट टू’, असा प्रदर्शित केला जाऊ  शकतो.

हिंदीत रिमेक पुढच्या वर्षी

एकीकडे नुकताच ‘रॅम्बो’ चित्रपट मालिकेतील शेवटचा सिनेमा समजला जाणारा लास्ट ब्लड प्रदर्शित झाला असतानाच, दुसरीकडे बॉलीवूडमध्ये या सिनेमाच्या पहिल्या भागाच्या रिमेकची तयारी सुरू आहे. आपल्या अ‍ॅक्शन सीन्स आणि मार्शल आर्टसाठी बॉलीवूडमध्ये नावाजल्या जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ हिंदी रिमेकमध्ये या देसी रॅम्बोची भूमिका साकारणार आहे. ‘रॅम्बो’च्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर टायगरने २०१७ साली इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यावेळी सिल्वेस्टरने त्याच्या हटके शैलीत हिंदी रिमेकला शुभेच्छा दिल्या होत्या. स्वत:च्या चित्रपटाचा पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलंय की, भारतात ‘रॅम्बो’चा रिमेक होत असल्याचे मी नुकतेच वाचले. ती एक उत्कृष्ट व्यक्तिरेखा आहे. ती तशीच पडद्यावर पुन्हा उतरवली जाईल, अशी अपेक्षा करतो असं सिल्वेस्टरने म्हटलं होतं. रॅम्बोचा हिंदी रिमेक पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.