हॉलिवूडचा सुपरस्टार सिल्व्हेस्टर स्टॅलोनने गेल्या आठवड्यात हरिद्वारमध्ये दिवंगत मुलगा सेजचे श्राद्ध केले. तीन वर्षांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये ३६ वर्षीय सेज मृत अवस्थेत आढळून आला होता. २०१२ मधील या घटनेवेळी माध्यमांमध्ये त्याचा मृत्यू अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे झाल्याचे म्हटले होते. परंतु, नंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे. आपल्याला सेज सारखा दिसतो, असे सिल्व्हेस्टरने हृषिकेश येथील एका गुरुजींना सांगितले. त्यानंतर त्याने मुलाच्या आत्म्यास शांती लाभावी, म्हणून श्राद्ध करण्यासाठी आपल्या कुटुंबातील एका सदस्याला भारतात पाठवले.
प्रतीक मिश्रापुरींनी श्राद्धाचा सल्ला दिल्यानंतर, छायाचित्रकारांचा ससेमिरा पाठीमागे लागेल या भितीने सिल्व्हेस्टरचा सावत्र भाऊ मायकल त्याची पत्नी आणि अन्य दोघाजणांनी हरिद्वार येथील कंकाल परिसराला भेट दिली. अपघात अथवा हत्या झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांचे ‘तिथी श्राद्ध’ तेथे करण्यात येते. ‘तिथी श्राद्धा’चा विधी पूर्ण केल्यानंतर ते फिलाडेल्फियाला परतले.
मृत मुलाच्या सातत्याने दिसण्याने स्टॅलोन खूप अस्वस्थ होतो. स्टॅलोनच्या कुटुंबियांना ही बाब अतिशय खासगी ठेवायची असल्याकारणाने राहण्यासाठी मी त्यांना एका सर्वसाधारण हॉटेलचा पत्ता दिला. सेजच्या श्राद्धानंतर मायकलने वयाच्या ४८ व्या वर्षी २०१२ मध्ये मृत्यू पावलेली टॉनी अॅन या आपल्या बहिणीच्या श्राद्धाचा विधीदेखील केल्याची माहिती मिश्रापुरींनी दिली.