उत्तर प्रदेश सरकारपाठोपाठ आता हरयाणा सरकारने देखील ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर लवकरच ‘तान्हाजी’ चित्रपटाला करमुक्त करण्याची अधिकृत घोषणा करणार आहेत. ‘तान्हाजी’ चित्रपटाला टॅक्स फ्री केलं जावं अशी मागणी हरयाणामध्ये फार आधीपासूनच सुरु होती. अखेर जनतेच्या आग्रहाखातर सरकारने हा नवा निर्णय घेतला आहे.

हरयाणा सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तान्हाजी यांचं शौर्य आणि त्यागापासून लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणने चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती केली होती. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने या विनंतीचा मान ठेवून चित्रपट टॅक्स फ्री केला आणि आता त्यापाठोपाठ हरयाणा सरकार देखील टॅक्स फ्री करणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांना देखील टॅक्स फ्री तान्हाजीचे वेध लागले आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षक देखील करमुक्त ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ची मागणी करत आहेत.

तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफअली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या स्वप्नामध्ये अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक असणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजीच्या माध्यमातून दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. केवळ चार दिवसांमध्ये चित्रपटाने ७५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये समाविष्ट होईल.