‘तन बुढ्ढा होता है, मन बुढ्ढा नहीं होता,’ अशी टॅगलाइन असलेला ‘सांड की आंख’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या ८६ वर्षीय चंद्रो तोमर आणि ८१ वर्षांची त्यांची नणंद प्रकाशी यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या पोस्टरमध्ये भूमी आणि तापसी ६० वर्षाच्या वयस्क महिलेच्या रुपात दिसून आल्या. मात्र त्यांचा हा लूक चाहत्यांच्या पसंती न पडल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी तापसीला या गोष्टीवरुन ट्रोल केलं. या दोघींवर टीकास्त्र होत असतानाच तापसीनेदेखील ट्रोलकऱ्यांना तिच्या निराळ्या अंदाजात उत्तर दिलं आहे.

प्रदर्शित पोस्टरमध्ये तापसी आणि भूमी ६० वर्षीय महिलांच्या रुपात दिसून येत आहेत. त्यामुळे एका तरुण अभिनेत्रीने अशा प्रकारची भूमिका साकारायला नको होती, अशा आशयाच्या अनेक टीका त्यांच्यावर करण्यात आल्या. मात्र आपल्या हटके वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तापसीने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे तिने दिलेल्या उत्तरामुळे अनेकांची तोंड बंद झाली आहेत.

“सांड की आंख चित्रपटाच्या पोस्टरवर नेटकऱ्यांनी जे उत्तर दिलं आहे, ते पाहून मला खरंच फार मोठा धक्का बसला आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी आणि भूमीने प्रचंड मेहनत घेतली आहे. आम्हाला आमच्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या महिलांची भूमिका साकारायची होती. त्यामुळे आमच्या समोर हे आव्हान होतं. मात्र तरीदेखील अनेकांनी आम्हाला ट्रोल केलं”, असं तापसी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “एका ३० वर्षीय अभिनेत्रीने जर कॉलेज तरुणीची भूमिका वठविली तर प्रेक्षकांना ती आवडते. मात्र त्याच अभिनेत्रीने एका ६० वर्षीय महिलेची भूमिका साकारली तर त्या अभिनेत्रीवर टीका केली जाते. मी एका चित्रपटामध्ये कॉलेज तरुणीची भूमिका साकारली होती, तेव्हा मात्र मला कोणीच प्रश्न विचारले नव्हते.आता मात्र अनेक टीका सहन कराव्या लागत आहेत. ३० व्या वर्षात आम्ही आमच्या वयापेक्षा तिप्पट वय असलेल्या महिलेची भूमिका साकारली यावरुन आमचं कौतुक करण्याऐवजी आमच्यावर टीका करण्यात येत आहे.

‘सांड की आँख’ या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप आणि निधी परमारने केली आहे. तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. याआधी त्यांनी ‘मै तेरा हिरो’, ‘एक विलन’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटांची पटकथा लिहिली होती. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.