एखादा सामाजिक मुद्दा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यावर मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर होतो. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा मागे नसतात. असाच एक सामाजिक मुद्दा सेलिब्रिटींद्वारे सध्या सोशल मीडियावर उचलला गेला आहे. समाजातील वंचित मुलांना त्यांचे अधिकार मिळावे यासाठी लहानपणीचा फोटो शेअर करत सेलिब्रिटी संदेश देत आहेत. #WhyTheGapChallenge असा हॅशटॅग वापरून अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या लहानपणीचा फोटो पोस्ट केला आणि त्यात त्याने तापसी पन्नूला नॉमिनेट केलं. यानंतर तापसीनेही तिच्या लहानपणीचा फोटो पोस्ट केला. मात्र या फोटोवरून ‘सेक्रेड गेम्स२’चा दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिची खिल्ली उडवली.

शालेय क्रीडा स्पर्धेत बक्षीस पटकावल्यानंतरचा फोटो तापसीने पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘खेळ हा नेहमीच माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे. प्रत्येक वर्षी माझ्यासाठी धावण्याचं मैदान हे जणू युद्धभूमीच व्हायची. यात मला माझ्या कुटुंबीयांनी आणि शाळेतल्या शिक्षकांनी फार मदत केली. दुर्दैवाने काही मुलांना ही साथ मिळत नाही.’ तापसीच्या या फोटोवर ‘चलो कोई अॅवॉर्ड तो मिला’ (चला, एखादा तरी पुरस्कार मिळाला) असं म्हणत अनुरागने तिची खिल्ली उडवली. यावर तापसीनेही त्याला मजेशीररित्या उत्तर दिलं.

‘हाहाहा.. शाळा-कॉलेजमध्ये सर्व ठीक होतं, आयुष्यात त्यानंतरच्या स्पर्धा जरा जास्तच योग्य पद्धतीने होऊ लागल्या,’ असं ती उपरोधिकपणे म्हणाली. या फोटोवर ‘उरी’ फेम विकी कौशलनेही कमेंट करण्याची संधी सोडली नाही. ‘एक-दोन जणांना धक्का नक्कीच दिला असशील,’ असं तो मस्करीत म्हणाला. त्यावरही तापसीने उत्तर देत म्हटलं की, ‘नाही, मी अत्यंत प्रामाणिक खेळाडू आहे. माझ्या निरागस चेहऱ्याकडे बघ.’