28 September 2020

News Flash

कंगनाच्या ‘बी ग्रेड’ टीकेवरून तापसीने घेतली शाळा

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आता दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

तापसी पन्नू, कंगना रणौत

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आता दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. अभिनेत्री कंगना रणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तापसी पन्नूला ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हणून हिणवलं. त्यानंतर तापसीनेही तिला सडेतोड उत्तर दिलं आहे.

तापसीने ट्विटरवर म्हटलं, ‘बारावी आणि दहावीनंतर आता आमचेसुद्धा निकाल समोर आले आहेत असं मी ऐकलंय. आमचं ग्रेड सिस्टम आता अधिकृत झालंय का? आतापर्यंत तर नंबर सिस्टमवर एखाद्याचं महत्त्व सिद्ध व्हायचं’, असा उपरोधिक टोला लगावत तापसीने कंगनाची शाळा घेतली आहे.

काय म्हणाली कंगना?

“या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी फक्त गमावू शकते. कारण मला माहितीये, उद्या ही मूव्ही माफिया गँग बाहेरून आलेल्या तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या २० कलाकारांना समोर आणेल. आणि हे कलाकार फक्त कंगनालाच घराणेशाहीचा त्रास होतो पण आमचं करण जोहरवर प्रेम आहे असं म्हणतील. जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात? तुम्ही तर आलिया भट्ट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगले दिसता. तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात. तरी तुम्हाला काम का मिळत नाही. तुमचं पूर्ण अस्तित्वच घराणेशाहीचा पुरावा आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूश आहात हे मला का सांगताय? मला माहितीये की भविष्यात असंच होईल आणि संपूर्ण सिस्टम मला वेडं ठरवेल”, असं कंगना या मुलाखतीत म्हणाली.

तापसीचं उत्तर

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तापसीने कंगनाच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. “करण जोहर मला आवडतो असं मी कुठेही म्हटलं नाही. त्याचप्रमाणे करण जोहरचा मला राग येतो असंही मी म्हटलं नाही. मी तर त्याला हाय, हॅलो, थँक्य यू संवादाशिवाय ओळखतसुद्धा नाही. माझं अस्तित्व माझ्या दिसण्यावरून आहे असा विचार मी अजिबात करत नाही. मीसुद्धा संघर्ष केलाय पण फक्त त्याची मार्केटिंग कधी केली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी दर वर्षी किमान चार चित्रपटांत काम केलंय. नुकतीच माझ्या पाच आगामी चित्रपटांची घोषणा झाली. कोण म्हणतंय की मला काम मिळत नाही? मी कंगनाची साथ देत नाही म्हणून ती आणि तिची बहीण माझ्यावर असले आरोप करतेय. माझ्या आतापर्यंतच्या कोणत्याच चित्रपटांची निर्मिती कंगना म्हणते त्या माफिया गँगने केली नाही. आगामी चित्रपटसुद्धा त्यांच्यासोबत करत नाहीये. मग माझं अस्तित्व हा घराणेशाहीचा पुरावा कसा असू शकतो? स्वत:च्या स्वार्थासाठी मी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा उचलू शकत नाही. या इंडस्ट्रीने मला माझी ओळख आणि पोट भरण्यासाठी खूप काही दिलंय. त्यामुळे या इंडस्ट्रीसोबत मी इतक्या कटू पद्धतीने वागू शकत नाही”, असं उत्तर तापसीने दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 6:56 pm

Web Title: taapsee pannu hits back at kangana ranaut accusations ssv 92
Next Stories
1 सिद्धार्थ जाधवच्या रॅप साँगचा ‘लाव रे तो व्हिडिओ’
2 ‘टकाटक’मधील ‘या’ बोल्ड गाण्याने मोडले विक्रम
3 “‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी मी माझं पूर्ण मानधन गमावलं”; अनुराग कश्यपचा रिचाला पाठिंबा
Just Now!
X