|| नीलेश अडसूळ

चित्रपटांशी तिचा किंवा तिच्या कुटुंबीयांचा दुरान्वये संबंध नसताना किंवा चित्रपट क्षेत्रातील कोणताच पाठीराखा नसतानाही, ती या क्षेत्रात आली, तिने अभिनय केला आणि तिने जिंकून घेतलं. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिच्या भूमिकांप्रमाणेच प्रत्यक्षातही बिनधास्त आणि बेधडक बोलणारी अभिनेत्री तापसी पन्नू. दिल्लीच्या संस्कारात वाढलेल्या तापसीच्या बोलण्यात आणि वागण्यातही तितकाच मोकळेपणा आणि स्पष्टवक्तेपणा आढळून येतो. सॉफ्टवेर इंजिनीयर ते मॉडेलिंग हा प्रवास आणि मग प्रादेशिक भाषेतील चित्रपट ते थेट बॉलीवूडपर्यंतचा प्रवास तिच्यासाठी आव्हानात्मक होता, असे तापसी सांगते. ‘मनमर्जीया’, ‘मुल्क’, ‘बदला’, ‘पिंक’ आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मंगल’च्या निमित्ताने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

‘मी आजवर केलेल्या चित्रपटांपैकी ‘मिशन मंगल’ हा माझ्या आयुष्यातला असा चित्रपट आहे ज्याच्याविषयी मला भीती किंवा दडपण कमी आणि उत्सुकताच जास्त होती. कारण असा विषय पहिल्यांदा समोर येतोय. आणि प्रत्येकजण याविषयी चर्चा करत आहे. इथे कोणाचीही प्रमुख भूमिका नसून प्रत्येक भूमिकेला स्वत:चं असं वेगळं महत्त्व आहे. म्हणून हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे. माझ्या भूमिकेविषयी अक्षय कुमार यांनी मला पहिल्यांदा कॉल केला तेव्हा त्यांनी खूप गोडवे गायले. स्क्रिप्ट छान आहे, बरेच नामवंत कलाकार आहेत, प्रत्येकाची समान भूमिका आहे, अमुक-तमुक बऱ्याच गप्पांनंतर मी त्यांना म्हटलं की मला स्क्रिप्ट ऐकायची आहे. आणि ती ऐकल्यानंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला की इतक्या उशिरा का माझी निवड केली? अशा उत्तम संहितेत माझी छोटी भूमिका असती तरी मी निर्धास्तपणे काम केले असते’, तिचे हे उत्तर अक्षय कुमारलाही चक्रावून टाकणारे ठरले असेल यात शंका नाही. मी कायम भूमिकेपेक्षा संहितेचा विचार करते, कारण प्रमुख भूमिका साकारण्यासाठी अनेक चित्रपट माझ्याकडे येतात. परंतु चित्रपट केवळ चित्रीकरणापर्यंत मर्यादित नसतो. त्याचा प्रदर्शनापर्यंतचा विचार मी करते. त्या अनुषंगाने ज्या ज्या संहिता मला योग्य वाटतात अशा चित्रपटांना मी होकार देते, असे तिने स्पष्ट केले. काही चित्रपट मी केवळ माझ्या भावी मुलांना दाखवण्यासाठी करते आहे, कारण अमुक चित्रपट आपल्या यादीत असायला हवा असे मला कायम वाटते. आणि असे बरेच चित्रपट फक्त मी माझ्या मुलांसाठीच केले आहेत. पण अजून मुलांचाच काही पत्ता नाही, असेही ती विनोदाने सांगते.

मुलांचा विषय काढल्याने साहजिकच तिच्या लग्नाचा प्रश्न आलाच. मात्र यावरही तिने मोकळेपणाने उत्तर दिले. लग्नाचा विचार माझ्याही मनात आहे, पण अजून मनासारखं कोणी भेटलं नाही. त्यामुळे घरचेही माझ्यापुढे लग्नाचा विषय काढणं टाळतात. वडिलांची बरीच इच्छा आहे, पण मी काय उत्तर देईन या भीतीपोटी बहुधा ते मला विचारतच नाहीत. किंबहुना आता माझ्याही आधी ते माझ्या धाकटय़ा बहिणीच्या लग्नाचा विचार करत आहेत, असं गमतीशीर उत्तर तिने दिलं.

इतक्या छोटय़ा भूमिकेबद्दल तुझ्याशी बोलताना अक्षय कुमार यांनाही विचार करावा लागला. मग उद्या जर सलमान खानच्या चित्रपटात केवळ एखाद्या गाण्यावर नाचण्यासाठी जर तुला विचारणा केली तर तुझी काय प्रतिक्रिया असेल? हा प्रश्न विचारताच तापसी मिश्कीलपणे म्हणते, सलमानजींनी मला आधी विचारू द्या. त्यांच्या अनेक चित्रपटांत केवळ एका गाण्यावर नाचण्यासाठी अनेक बडय़ा नायिकांनी काम केले आहे. त्यामुळे माझ्याकडे अशी संधी आली तर मी नक्कीच विचार करेन. आणि प्रश्न गाण्याचा किंवा नाचण्याचा नाही, मुळात त्या संहितेत त्या गाण्याला काय महत्त्व आहे किंवा त्या गाण्यानंतर तापसी लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहण्यासारखी भूमिका असेल तर मी नक्कीच करेन. आपल्या चार चित्रपटांपैकी एखाद्या चित्रपटात अशी हलकीफुलकी भूमिका असेल तर करायला काहीच हरकत नाही. त्या निमित्ताने वेगळं काही करण्याची संधी आपल्याला मिळते, असं तिने सांगितलं.

आपल्याकडे नायिकेला स्वतंत्र भूमिकेत पाहिले जाते आणि या चित्रपटात पाच पाच अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. एकंदरीतच या सगळ्यांबरोबर एकत्रित काम करण्याचा अनुभव कसा होता, यावर तापसी म्हणते, एरव्ही बायका एकत्र आल्या की भांडणं होतात, असा समज आहे. पण इथे नेमकं उलटं चित्र होतं. आम्ही पाचजणी सतत इतक्या गप्पा मारायचो की शॉट तयार असतानाही आम्हाला गप्पा आवरणे कठीण जायचे. इथे कोणतीच असूया नव्हती. प्रत्येकीची भूमिका तितकीच महत्त्वाची असल्याने आम्हाला एकमेकींकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. आणि अक्षय कुमार यांनी सेटवरचं वातावरण कायम हसतंखेळतं ठेवलं होतं. शिवाय विद्या बालन केवळ माझी मैत्रीण नसून तिच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. ज्यावेळी मी या क्षेत्रात पाऊ ल ठेवलं. त्यावेळी तिचा ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तिची भूमिका पाहून मी अवाक् झाले. एखादी अभिनेत्री हिरो होऊ  शकते, याची जाणीव त्या दिवशी तिने मला क रून दिली आणि मी तिच्या प्रेमात पडले, असे तापसीने सांगितले. आजवर केलेल्या चित्रपटांमधून केवळ प्रेक्षकांचाच नाही तर लेखक आणि दिग्दर्शकांचाही मी विश्वास जिंकला, याचा आनंद होतो. कारण एखादी भूमिका साकारून मी त्याला न्याय देऊ  शकते. हे लेखक-दिग्दर्शकांना वाटणे माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे, असे ती म्हणते. आगामी ‘सांड की आँख’ या चित्रपटात माझी वेगळी भूमिका आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर तो प्रदर्शित होत असल्याने अधिकाधिक लोकांनी तो पाहावा. हा चित्रपट किती पैसे मिळवेल हे मला माहिती नाही, पण आपल्या घरात राबणाऱ्या प्रत्येक आईसाठी हा चित्रपट आहे. आई स्वत:साठी कधीच जगत नसते. तिने जगायला हवं हे सांगणारा चित्रपट आहे. विशेष म्हणजे तो सर्व कुटुंबाने एकत्र बसून पाहिला तर नक्कीच त्याची मजा वेगळी असेल, असे तिने सांगितले. तिकीटबारीवर गल्ला कमावण्यापेक्षा  चित्रपट प्रदर्शित होऊन लोकांपर्यंत पोहोचतोय हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण इथे दिवसाला कितीतरी चित्रपट बनत असतात. अनेक चित्रपट प्रदíशतच होत नाहीत. अनेकांचे चित्रीकरणही पूर्ण होत नाही. यापेक्षा चित्रपट करून तो प्रदर्शित झाला याचे समाधान आणि आनंद नक्कीच मोठा आहे, असे ती ठामपणे आणि आनंदाने सांगते.

तारतम्य हवेच..

सध्या काश्मीर प्रश्न तापलेला असताना त्यावरही तिने आपले मत व्यक्त केले. ज्या विषयातली आपल्याला अधिक माहिती नाही त्या विषयावर बोलू नये. मुळात काश्मीरच्या लोकांच्या काय भावना असतील हे तुम्ही दिल्ली-मुंबईत बसून सांगणे योग्य नाही. आपल्याला मत मांडण्याचा अधिकार दिला म्हणून काहीही बोलायचे असे होत नाही. मला दिल्लीविषयी विचारा. माझं आजवरचं आयुष्य तिथेच गेलं आहे. त्यावर मी नक्कीच ठामपणे बोलेन. आणि  समाजमाध्यमांचा लोक चुकीच्या पद्धतीने वापर करू लागले आहेत. अशा लोकांकडे दुर्लक्ष करा म्हणजे प्रकरणांची गंभीरता कमी होईल, असा सल्लाही तापसी देते.

कंगनाची ‘कॉपी’..

बॉलीवूडमध्ये सध्या तुला कंगना राणावतची ‘सस्ती कॉपी’ म्हणतात असे विचारताच हा वाद उकरून काढण्याबद्दल एकदाही तिने नाराजी व्यक्त केली नाही. उलट, यावरही तिने चांगलेच उत्तर दिले. ‘भले मला कॉपी म्हणत असतील, पण ती कोणाची कॉपी म्हणतात हेही माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्या अभिनेत्रीने शंभर करोडहून अधिक नफा कमावणारे चित्रपट केले आहेत. अशा अभिनेत्रीचे नाव माझ्याशी जोडले जाते यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. आणि मी नक्कीच या क्षेत्रात सगळ्यांपेक्षा स्वस्त आहे. कारण इतरांएवढे पैसे मी अजून आकारत नाही’, असेही ती गमतीने म्हणते. मी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहते. इतर कुणासाठी आपण स्वत:ला त्रास करून घेणे माझ्या तत्त्वात बसत नाही. माणसाची ओळख ही त्याच्या कामातून होते. आणि मला फक्त कामचुकारपणा करणाऱ्यांवर चीड येते. तुम्ही काम शंभर टक्के करा, यश हे तुमचेच असेल, असेही ती विश्वासाने सांगते.