बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू हिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

तापसीने ऋषि कपूर यांच्यासोबत ‘मुल्क’ आणि ‘चश्मे बद्दूर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केले होते. या चित्रपटांच्या वेळी आलेला अनुभव तिने या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. “मी त्यांच्यासोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले. परंतु आजवर इतका आनंद कुठल्याही दुसऱ्या कलाकारासोबत काम करताना आला नव्हता. ते एक उत्कृष्ट अभिनेता होते. आपल्या सहकलाकारांची ते तोंड भरुन स्तुती करायचे. त्यांच्यासोबत आणखी काम करायचे होते. त्यांच्याकडून खुप काही शिकायचे होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे आमची हॅटट्रीक होउ शकली नाही.” अशा आशयाची पोस्ट लिहून तापसीने दु:ख व्यक्त केलं आहे.

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.