केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठिंबा मिळताना दिसत आहे. रकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाला मंगळवारी अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही दिलाय. त्यामुळे सोशल मिडियावरील वातारवण ढवळून निघालं आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटींनी परदेशी दबावाला बळी न पडण्याचं आवाहन करत भारताची एकता कायम ठेवण्यासाठी आपल्या चाहत्यांना साद घातली आहे. रिहानाच्या ट्विटनंतर अनेक सेलिब्रिटींनी भारत हा प्रोपोगांडाविरोधात म्हणजेच भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर रचण्यात येणाऱ्या कटाविरोधात एकत्र उभा आहे असा मजकूर असलेले ट्विट केले आहेत. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, विराट कोहली, अक्षय कुमार, करण जोहर, सुनील शेट्टी, भाजपाचे अनेक नेते आणि इतर मान्यवर मंडळींचाही समावेश आहे. मात्र आता याच सेलिब्रिटींना अभिनेत्री तापसी पन्नूने नाव न घेता टोला लगावला आहे.

तापसीने ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक ट्विट तुमच्या ऐक्याला बाधा आणत असेल, एक जोक तुमचा विश्वास डळमळीत करत असेल किंवा एका कार्यक्रमामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर तुम्ही दुसऱ्यांना कट कारस्थानासंदर्भात सांगण्याऐवजी स्वत:ची संपूर्ण समाज व्यवस्था आणखीन मजबूत करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं तापसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तापसीने आपल्या या ट्विटमधून शेतकरी आंदोलनासंदर्भात रिहानाने केलेल्या ट्विटनंतरच्या सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांबरोबरच स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला त्याच्या कार्यक्रमामधून करण्यात आलेली अटक, तांडव या वेबसिरीजवरुन सुरु झालेला वाद अशा अनेक गोष्टींचा अप्रत्यक्षपणे दाखला दिला आहे.

रिहाना काय म्हणाली?

मंगळवारी रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. रिहानाने ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केलं. शेतकरी आंदोलनावर कोणीही काहीच बोलत नसल्याची खंत रिहानाने व्यक्त केलीय. सीएनएनच्या वृत्ताची लिंक शेअऱ करत तिने या आंदोलनाबद्दल चर्चा का केली जात नाहीय असा प्रश्न उपस्थित केला आहे. दिल्लीच्या सीमेवरील भागात आंदोलन सुरु असणाऱ्या ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आल्याचा उल्लेख असणारं वृत्त रिहानाने शेअर केलं आहे.

नक्की पाहा >> Sunny Leone, Johnny Sins, Mia Khalifa एकाच वेळी ट्रेण्डमध्ये; जाणून घ्या नक्की कारण काय?

पडले दोन गट

रिहानाच्या ट्विटवरुन नेटकऱ्यांमध्येच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी रिहानाने हा मुद्दा मांडल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाची दखल घेतली जाईल असं म्हटलं आहे तर या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी रिहानानं हे ट्विट पैसे घेऊन केल्याचा आरोप केला आहे. रिहानाला ज्या गोष्टीबद्दल काहीही माहिती नाही तिने त्याबद्दल बोलू नये असं मतही या आंदोलनाविरोध करणाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.