कोणताही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणे काही सोपे नाही. दाक्षिणात्य चित्रपटांमधून आलेली अभिनेत्री तापसी पन्नूने मात्र तिच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे बॉलिवूडमध्ये यश संपादन केले. मात्र हा प्रवास सहज नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसीने तिच्या स्ट्रगलिंगबद्दल सांगितले. एका कास्टिंग डायरेक्टरने तिला पनौती असं म्हटल्याचा अनुभव तिने या मुलाखतीत सांगितला.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली की, ”चष्मेबद्दूर चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने मला म्हटलं होतं की त्या चित्रपटात न चालण्यासाठी एकच गोष्ट होती ती म्हणजे मी. त्याने माझ्यावर पनौती असल्याचा ठप्पाच लावला होता. अनेकदा माझं नाव मोठं नसल्याने मला चांगल्या भूमिकांसाठी नाकारलं गेलं होतं. मला चित्रपटात घेतल्यास तो फ्लॉप ठरतो असं पसरवलं गेलं होतं. माझे दोन-तीन दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपटल्याने मी बॉलिवूडची वाट धरली असाही टोमणा मारला गेला होता.”

‘पिंक’ या चित्रपटानंतर तापसी बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आली. मात्र इथेही तिला सुरुवातीला काही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला होता. दहा-पंधरा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करूनसुद्धा मला बॉलिवूडमध्ये आल्यावर सुरुवातीला कार्यक्रमांमध्ये सहाव्या-सातव्या रांगेत बसवायचे, असं तिने सांगितलं.

बरेच नकार पचवल्यानंतर आता कुठे ओळख मिळू लागल्याचं तापसी सांगते. तापसी पन्नू हे नाव आता बॉलिवूडमध्ये चांगलंच चर्चेत आहे. एकानंतर एक दमदार अशा भूमिका तिने साकारल्या आहे. ‘पिंक’, ‘बदला’, ‘मुल्क’ यांमधल्या तिच्या भूमिकांचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं आहे.