भारतीय क्रिकेट आणि पुरूष हे एक वेगळंच समीकरण आहे. भारतात क्रिकेटला धर्म मानतात आणि क्रिकेटचा संबंध सामन्यत: पुरुष क्रिकेटशी जोडतात. पण भारतात मिताली राज हिने महिला क्रिकेटपटूंनाही क्रिकेट विश्वात स्थान आहे हे दाखवून दिले. भारतातील महिला क्रिकेटला आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वकौशल्याने वलय मिळवून देण्यात मितालीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय महिला क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर नेणाऱ्या मिताली राज हिचा आज ३७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त बॉलिवूडकडून मितालीली एक खास भेट देण्यात आली.

मिताली राज

 

मितालीचा जन्म ३ डिसेंबर १९८२ ला राजस्थानमधील जोधपूर शहरात झाला. तिच्या ३७ व्या वाढदिवशी तिच्या क्रिकेट कारकिर्दीवर चरित्रपट म्हणजेच बायोपिक करणार असल्याची गुड-न्यूज मितालीला देण्यात आली. शाबाश मिथू असे या बायोपिकचे नाव असणार आहे. या चरित्रपटात मितालीची प्रमुख भूमिका तापसी पन्नू करणार आहे.

Taapsee-Pannu-
तापसी पन्नू

 

बॉलिवूडची ‘मिताली राज’ म्हणजेच तापसीने आज मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तापसीने केवळ मितालीचे अभिनंदनच केले नाही, तर तिच्यासोबत तिचा वाढदिवसदेखील साजरा केला. तापसीने ट्विटरवर काही फोटो शेअर केले. महत्त्वाचे म्हणजे त्यातच तापसीने मितालीच्या बायोपिकची घोषणादेखील केली. अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिच्यासोबत वाढदिवस साजरा केल्याचे फोटो शेअर केले.

मितालीने केक कापल्याचे फोटो तापसीने शेअर केले. त्या फोटोंसोबत तिने कॅप्शनदेखील लिहिले आहे. कॅप्शनमध्ये तिने मितालीला वचन दिले की स्वत:चा (मितालीचा) बायोपिक पडद्यावर पाहून तिला तिचा अभिमान वाटेल. ” कर्णधार मिताली, तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. मी तुला यंदाच्या वाढदिवशी काय गिफ्ट द्यावे हे मला माहिती नाही. मी तुला काय देऊ शकते तेदेखील मी सांगू शकत नाही, पण मी वचन देते की #शाबाशमिथू या बायोपिकच्या माध्यमातून माझ्या रूपात स्वतःला पडद्यावर पाहिल्याने तुला अभिमान वाटेल”, असे तिने ट्विटमध्ये लिहिले आहे.

याचसोबत तिने तळटीप देखील लिहिली आहे. ‘मी सर्व ‘कव्हर ड्राइव्ह’ शिकण्यास तयार आहे’, असे तापसीने म्हटले आहे.