‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत बागाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाची इमारत सील करण्यात आली आहे. इमारतीत येणारा भाजीविक्रेता व तिथे राहणाऱ्या तीन जणांना करोनाची लागण झाल्याने इमारत सील करण्यात आली आहे. ‘होय, बातमी खरी आहे. इमारतीतील तीन जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने सील करण्यात आली आहे. मी सुद्धा १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहत आहे’, असं तन्मयने स्पष्ट केलं.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “सर्वांसाठीच ही फार कठीण वेळ आहे. प्रत्येकजण त्याच्या कुटुंबीयांच्या बाबतीत घाबरलेला आहे. आम्हाला इमारतीबाहेर पडण्यास मनाई आहे आणि सध्या सर्वांसाठी हेच हिताचे आहे. मुंबई महापालिका त्यांचं काम अत्यंत चोख करत आहे. त्यांनी संपूर्ण इमारत सॅनिटाइज केली आहे.”
आणखी वाचा : मालिकेतील ‘रावण’ खऱ्या आयुष्यात असतात रामभक्तीत लीन; ‘रामायण’ पाहून म्हणाले…
त्यांच्या इमारतीत येणाऱ्या भाजीविक्रेत्यालाही करोनाची लागण झाल्याने त्याने अधिक भीती व्यक्त केली आहे. “शनिवारी भाजीविक्रेत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी त्याच्याशी थेट संपर्कात नव्हतो. पण माझ्या कुटुंबीयांसाठी मी स्वत: १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहणार आहे”, असं तो पुढे म्हणाला. इमारतीत ज्या तीन जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यांनी कुठलाच प्रवास केला नव्हता. त्यामुळे अशाप्रकारे करोना व्हायरस पसरत असल्याने नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2020 4:34 pm