छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत असल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता घनश्याम यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.

सप्टेंबर २०२०मध्ये ७७ वर्षीय घनश्याम यांना कर्करोग झाल्याचे कळाले होते. त्यानंतर त्यांची सर्जरी झाली होती. प्रकृती ठिक झाल्यानंतर घनश्याम यांनी पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता घनश्याम यांचा मुलगा विकासने वडिलांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.

आणखी वाचा : मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटात झळकणार कार्तिक आर्यन

नुकाताच विकासने ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ‘सध्या घनश्याम यांची प्रकृती ठिक आहे. त्यांना कोणताही त्रास होत नाही. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांची केमोथेरपी सुरु आहे. पुढच्या महिन्यात त्यांचे PET स्कॅन करायचे आहे’ असे विकासने सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात घनश्याम हे गुजरातमधील दमण येथे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेले होते. बऱ्याच दिवसांनंतर चित्रीकरण करतानाचा अनुभव सांगते ते म्हणाले होते की, ‘माझी प्रकृती ठीक आहे पण ट्रीटमेंट पुन्हा सुरु केली आहे. सध्या केमोथेरपी सुरु आहे. चार महिन्यांतर मी एक खास सीन शूट केला आणि पुन्हा चित्रीकरण करताना मला प्रचंड आनंद झाला होता.’ आता नट्टू काका लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.