छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने नुकतीच १० वर्षे पूर्ण केली असून अकराव्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून या विनोदी मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवले. यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या परिचयाची झाली आहे. जेठालाल, दयाबेन यांसारख्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेता दिलीप जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत ‘जेठालाल गडा’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या मालिकेमुळे त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की आता दिलीप यांना बरेचजण त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ‘जेठालाल’ याच नावाने जास्त ओळखतात. याच नावाचा एक गमतीशीर किस्सा दिलीप यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला.

वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत दिलीप जोशी य़ांनी एक गमतीशीर किस्सा सांगितला. ‘इतक्या वर्षांत माझी खरी ओळख हरवली आहे. लोक मला दिलीप नाही तर जेठालाल याच नावाने हाक मारतात. एकदा आम्ही अहमदाबादला शूटिंगसाठी गेलो होतो आणि आम्ही एका ओपन जीपमध्ये होतो. आमची जीप एका सिग्नलजवळ थांबली. तेव्हा सिग्नलजवळ असलेला एक भिकारी मला पाहून अचानक जेठालाल, जेठालाल म्हणून ओरडू लागला. हे ऐकून मीदेखील थक्क झालो. एखाद्याच्या घरी टिव्ही बघताना त्याने मला पाहिले असावे असा मी विचार केला. मात्र त्यावेळी मला एका अभिनेत्याच्या ताकदीचा अनुभव आला. अशी अजून एक घटना आहे. मी एका लग्नाला गेलो होतो आणि तिथे मला एक महिला भेटली. त्या महिलेची आई ८० वर्षांची असून, वय झाल्याने ती कुटुंबात कोणालाच ओळखू शकत नव्हती. मात्र जेव्हा कधी माझी मालिका टिव्हीवर लागते तेव्हा त्या मला आवर्जून ओळखतात आणि हसू लागतात, असे मला त्या महिलेने सांगितले. हे ऐकून मला फार आनंद झाला.’

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या नऊ वर्षांच्या प्रवासादरम्यान त्यातील भूमिकांना भरभरून प्रसिद्धी मिळाली आणि आजही ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकतेय हे या उदाहरणानंतर नक्कीच स्पष्ट झाले.