छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील दयाबेनचा भाऊ सुंदरलालची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानीला काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला आहे. आता त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी हेमाली वकानीला देखील करोनाची लागण झाली आहे. करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्यामुळे हेमालीला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये हेमालीने करोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. ‘मयूर तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण पूर्ण करुन ७ मार्च रोजी घरी परतला होता. त्यानंतर त्याला काही करोनाची लक्षणे जाणवू लागली. पण सुरुवातीला प्रवासामुळे त्याला त्रास होत असेल असे आम्हाला वाटले. त्यानंतर आम्ही त्याची करोना चाचणी करुन घेतली आणि रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. चाचणी करायला आम्हाला थोडा उशिर झाला. त्यामुळे ११ मार्च रोजी त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले’ असे हेमाली म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘आता आम्ही दोघेही ठिक आहोत. मला करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्यामुळे मी होम क्वारंटाइन आहे. मयूरवर सध्या उपचार सुरु असून त्याला उद्या किंवा परवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे.’

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत मयूर सुंदरलाल म्हणजेच दया बेनच्या भावाची भूमिका साकारत आहे. मालिकेतील मयूर आणि दिशाची भाऊ-बहिणीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. मयूर आणि मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणी दिशा वकानी हे खऱ्या आयुष्यातही बहिण-भाऊ आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून दिशाने मालिकांमधून ब्रेक घेतला आहे. तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.