बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेता सैफ अली आणि करिना कपूर. अगदी चित्रपटांच्या प्रमोशपासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापर्यंत अनेक बातम्यांसाठी हे दोघेही कायमच चर्चेत असतात. या दोघांबरोबरच त्यांचा मुलगा तैमुरही नेहमीच चर्चेत असतो. मग त्याच्या नावाने बाजारात आलेल्या बहुल्या असो किंवा त्याचे व्हायरल झालेले फोटो असून तैमुर हा अगदी लहानपणापासूनच सेलिब्रिटी झाला आहे. येत्या २० डिसेंबर रोजी तैमुर तीन वर्षांचा होणार आहे. तैमुरचा तिसरा वाढदिवस कशापद्धतीने साजरा केला जाणार आहे यासंदर्भात त्याची आई, करिना हिने नुकतीच एका मुलाखतीमध्ये माहिती दिली.

बॉलिवूड लाइफ डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये करिनाने तैमुरचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी सुरु असल्याचं म्हटलं आहे. यंदाच्या वाढदिवसासाठी तैमुरने एक खास गिफ्ट मागितल्याचेही करिनाने सांगितलं आहे. तैमुरचा तिसरा वाढदिवस मुंबईमध्येच साजरा होणार आहे. मात्र या वाढदिवसानिमित्त आपल्याला दोन केक कापायचे आहेत असं तैमुरने त्याच्या आई म्हणजेच करिनाला सांगितलं आहे. “मला यंदा दोन केक कापायचे आहेत, असं तैमुरने मला सांगितलं आहे. त्यापैकी एक केक हा हल्कचा (सुपरहिरो) असेल तर दुसरा सांताक्लॉजचा असेल. दोन केक का कापायचे आहेत असं त्याला विचारलं असता तो मला दोघेही खूप आवडतात असं तो सांगतो,” अशी माहिती करिनाने वाढदिवसाबद्दल बोलताना दिली.

वाढदिवसानिमित्त काय विशेष असेल असं करिनाला विचारण्यात आलं असता तिने कुटुंबातील सर्व लोक एकत्र येऊन वाढदिवस साजरा करतील असं सांगितलं. “मी आणि सैफ एका जाहिरातीच्या शूटींगमध्ये व्यस्त असणार आहोत. मात्र संध्याकाळी कुटुंबियांबरोबर आम्ही सर्वजण तैमुरचा वाढदिवस साजरा करु. यावेळी कुटुंबियांबरोबरच तैमुरच्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणिंना आम्ही आमंत्रित करणार आहोत,” असं करिना म्हणाली.

करिनाने १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली. दोघांमध्ये असलेले १० वर्षांचे अंतर चांगलेच चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यानंतर चार वर्षींनी म्हणजेच २०१६ साली तैमुरचा जन्म झाला. तैमुरचं नाव आपण आधीपासूनच ठरवलं होतं असंही करिनाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. सैफ आणि करिनाने त्यांच्या बाळाचं नाव तैमुर ठेवल्यामुळे त्यावेळी प्रचंड वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या नावाचा विरोध केला होता. मात्र हा विरोध पत्करुन करिना आणि सैफने आपल्या मुलाचं नाव तैमुरचं ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तेव्हापासूनच तैमुर कायमच चर्चेत असतो. तैमुरची लोकप्रियता एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आज तैमुर सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर असतात. अनेकांनी त्याच्या नावाने सोशल नेटवर्किंगवर फॅन पेजेसही बनवली आहेत.