गीत-संगीत आणि चित्रपट यांचं एक अनोखं नातं आहे. एखादी कथा किंवा प्रसंगाला गाण्याची जोड देऊन तो अधिक चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेली आहे. याच कारणामुळे काही गाणी चित्रपट येण्याआधीच लोकप्रिय होतात, तर काही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर. असंच एक गाणं फार दिवसांपासून लग्नसोहळे, हळद, मिरवणुका यांच्यासह सणासुदीच्या वेळी वाजत आहे. ते गाणं म्हणजे “आपला हात जग्गनाथ…”.

‘आपला हात जग्गनाथ’ हे गाणं आगामी ‘टकाटक’ या मराठी चित्रपटामधील आहे. या गाण्यामध्ये एका नव्या को-या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘टाईमपास’ या चित्रपटातून नावारुपाला आलेला प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री यांची केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २८ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसांपूर्वीच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या आनंद शिंदे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलेलं “आपला हात जग्गनाथ…’’ हे गाणं  जय अत्रे यांनी लिहिलं आहे. तर संगीतकार वरूण लिखते यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं प्रथमेश आणि रितिका यांच्यावर चित्रीत करण्यात आल्यानं त्याच्या केमिस्ट्रीचा अनुभवही प्रेक्षकांना घेता येईल. पदार्पणातील चित्रपट असूनही रितिकानं दणकेबाज अभिनय करत प्रथमेशला उत्स्फूर्त साथ दिल्याचं ‘टकाटक’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यावरून ही जोडी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांवर जादू करणार यात शंका नाही.

एखाद्या गंमतीशीर कथानकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणं ही मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाची शैली आहे. त्यांचे यापूर्वाचे चित्रपट याची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. या चित्रपटात मिलिंद कवडे यांना ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंद्रजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे या निर्मात्यांची साथ लाभली आहे. चित्रपटाचा जॉनर जरी सेक्स कॉमेडी प्रकारात मोडणारा असला तरी कुठेही थिल्लरपणा किंवा वाह्यातपणा होणार नाही याची पुरेपूर काळजी निर्माता-दिग्दर्शकांनी घेतल्यानं ‘टकाटक’च्या रूपात एक मनोरंजक चित्रपट पाहिल्याचं समाधान प्रेक्षकांना मिळेल.

या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शनासोबतच मिलिंद कवडे यांनी अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली आहे. संजय नवगीरे यांनी अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे. हजरथ शेख (वली) यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे.