दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाल्यानंतर आता त्याच्याविरोधात अभिनेता हृतिक रोशन मैदानात उतरला आहे. हृतिकच्या आगामी ‘सुपर ३०’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल करत आहे. त्यामुळे त्याच्यावर असलेल्या आरोपांची पडताळणी करून गरज भासल्यास कडक कारवाई करा अशी विनंती हृतिकने निर्मात्यांना केली आहे.

‘लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत मी काम करणं अशक्य आहे. मला त्या घटनेबाबत फारशी माहिती नाही. पण मी निर्मात्यांना विनंती केली आहे की योग्य ती माहिती काढून गरज भासल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करा,’ असं हृतिकने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं. ‘मी टू’ #MeToo मोहिमेचं समर्थन करत महिलांनी पुढे येऊन अशा घटनांबद्दल बोललं पाहिजे आणि दोषींना शिक्षा ही झालीच पाहिजे असं मत हृतिकने मांडलं.

वाचा : अवघ्या एका मिनिटात नानांनी आटोपली पत्रकार परिषद

‘क्वीन’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलवर एका तरूणीने छेडछाडीचा आरोप लावला होता. त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतनं पीडित महिलेचं समर्थन करत विकास बहलवर काही आरोप केले. ‘त्या महिलेने केलेल्या आरोपात तथ्य आहे आणि त्यावर मी पूर्णतः विश्वास ठेऊ शकते. २०१४ मध्ये ‘क्वीन’ सिनेमाचं शूटिंग करत होते, त्यावेळी विकास विवाहित होते. आपल्या जोडीदारासोबतच्या शारीरिक संबंधांबाबतच्या गोष्टी ते बऱ्याचदा माझ्यासोबत शेअर करायचे. मी त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर कोणतेही विधान, मत व्यक्त करत नाही, पण आपण अनुभवू शकतो की हे सर्व त्यांच्यासाठी एक व्यसन झाले आहे. जेव्हा कधीही विकास मला भेटायचे तेव्हा विचित्र पद्धतीनं आलिंगन द्यायचे, माझ्या केसांचा सुगंध आवडतो, असे सांगायचे. त्यांच्या हालचालींवरुन त्यांच्या वागण्यात काहीतरी चुकीचे आहे, असे नेहमी वाटायचे,’ असं कंगना म्हणाली होती.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर असभ्य वर्तनाचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे. यामध्ये लेखक चेतन भगन, गायक कैलाश खेर, अभिनेता रजत कपूर आणि दिग्दर्शक विकास बदल अशी नावं समोर आली आहेत.