‘तुझ माझं ब्रेक अप’ फेम अभिनेत्री केतकी चितळे हीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांच्या शिष्टमंडळास तिने मुख्यमंत्र्यांबरोबरच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली. अश्लील भाषेत करण्याच आलेल्या ट्रोलींगचे गांभीर्य तिने यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रकऱणाचं गांभीर्य लक्षात घेत अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्या ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही या भेटीनंतर केतकीला मुख्यंत्र्यांनी दिले आहे.

संबंधित प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे केतकीने एक निवेदनही सादर केले. याच निवेदनाच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून खोट्या अकाउंटच्या माध्यमातून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्याची सूचना गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना केली आहे. यासंदर्भातील वृत्त खाजगी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केतकीसहीत या शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात आयटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासनाने सदर प्रकरणात कठोर पाऊले उचलावीत. त्याचप्रमाणे आयटी अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.