‘वाय झेड’, ‘फास्टर फेणे’, ‘फोटोकॉपी’ या सिनेमांमुळे पर्ण पेठे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय झालं. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात पर्ण पेठे ही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राइमसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्याचे काम करेल’ असे पर्ण पेठे म्हणाली.

वाचा : मराठवाड्याच्या समृद्ध परंपरेतला नवा मराठी सिनेमा ‘रॉमकॉम’

‘सायबर क्राईम या विषयाभोवती आपल्याकडे फारच कमी चित्रपट आले आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना आपण अनेकदा आपले पासवर्ड आणि बँकेचे खाते क्रमांक सेव्ह करतो. त्यामुळे आपले पैसे जाऊ शकतात किंवा आपल्या पर्सनल गोष्टी लीक होऊ शकतात. त्याविषयी आपण सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ‘टेक केअर गुड नाईट’ हा सिनेमा मनोरंजनासोबत तुमचे डोळे उघडण्याचे काम करेल,’ असेदेखील ती म्हणाली.