देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे या काळात अत्यावश्यक सुविधा सोडली. तर सारं काही बंद आहे. मात्र तरीदेखील काही नागरिक उगाच कामाव्यतिरिक्त घरातून बाहेर पडताना दिसतात. त्यामुळे निर्थक कारणासाठी रस्त्यावर फिरणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी ठिकठिकाणी पोलीस गस्त घालत आहे. विशेष म्हणजे दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांचे अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आभार मानले असून त्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे.

देशात लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून प्रत्येक शहरात,गावात पोलीस गस्त घालत आहेत. अनेक पोलीस असेही आहेत जे अहोरात्र काम करत आहेत. देशातील नागरिक घरात राहून सुट्टी एन्जॉय करत आहेत. तर दुसरीकडे मात्र पोलीस जीवाची, आरोग्याची पर्वा न करता त्यांचं कर्तव्य बजावत आहे.त्यामुळेच सिद्धार्थने ट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत.

“तुम्ही खरंच खूप महत्त्वाचं आणि उत्तम काम करत आहात. आमच्या सुरक्षेसाठी तुम्ही जे काम करताय त्यासाठी मनापासून धन्यवाद. कामाप्रती असलेल्या तुमच्या वचनबद्धतेला आणि निर्धाराला मनापासून सलाम. स्वतःची पण काळजी घ्या. खूप प्रेम. आणि मनापासून आभार”, असं ट्विट सिद्धार्थने केलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थचं ट्विट वाचल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला धन्यवाद देत. “तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या”, असा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस सोशल मीडियावर उत्तम प्रकारे सक्रीय असून नागरिकांनी केलेल्या ट्विटला हजरजबाबीपणे उत्तर देत असतात.