भारतात तामिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यात वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला. प्रसारमाध्यामांच्या वृत्तानुसार पिता-पुत्र दोघांना पोलीस कोठडीत अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले होते. तामिळनाडूमध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या घटनेचा निषेध केला. अभिनेत्री तमन्ना भाटीयाने देखील ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

तमन्नाने ट्विटमध्ये कठीण काळात एखादा माणूस इतका क्रूर होतो की तो माणुसकीही विसरतो. तो इतका क्रूर कसा होऊ शकतो. न्याय हा सर्वांना मिळायलाच हवा या आशयाचे ट्विट तमन्नाने केले आहे.

१९ जून रोजी लॉकडाउन दरम्यान मोबाइलचे दुकान सुरु ठेवले म्हणून चौकशीसाठी पी. जयराज (५९) आणि जे. बेनिक्स साथाकुलम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोठडीत पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

फेनिक्स आजारी पडला व कोविलपत्ती जनरल हॉस्पिटलमध्ये २२ जून रोजी त्याचा मृत्यू झाला व त्याच्या वडिलांचा २३ जून रोजी मृत्यू झाला. पोलिसांच्या या अमानुषतेचा राज्यभरातून निषेध होत असून चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे तर पोलीस निरीक्षकाची बदली झाली आहे.