दिवसेंदिवस देशात करोना व्हायरसचा फैलाव वाढत चालला असल्याचे दिसत आहे. सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसत आहे. अनेक मालिकांच्या सेटवर कलाकार आणि क्रू मेंबर्सची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. आता अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी तपन्नाला ताप आला होता. तसेच तिला करोनाची सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे करोनाची चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली. ती सध्या हैद्राबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी तमन्नाने ट्विट करत तिच्या आई-वडिलांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते. तिने पोस्टमध्ये तिच्या आई-वडिलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे करोना चाचणी केली आणि ती पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ६५ लाखांच्या पुढे गेली आहे

दिवसाला ९० ते ९५ हजार करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७० ते ८० हजारांवर पोहोचली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ६५ लाखांच्या पुढे गेली आहे तर बळींची संख्याही एक लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ७५,८२९ लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७४ इतकी झाली. याच कालावधीत ९४० लोकांचा मृत्यू ओढवल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १ लाख एक हजार ७८२ इतकी झाली आहे.