छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात मावळ्यांचे अनन्यसाधरण महत्व आहे. याच शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आणणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वटवणार आहेत. नुकताच या चित्रटाच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या ट्रेलरमध्ये मोघलांच्या ताब्यात असणाऱ्या कोंढाणा किल्यावर पुन्हा भगवा कसा फडकवला जाईल याकडे शिवाजी महाराजांचे लक्ष असते. त्यासाठी ते मावळ्यांमधील नरवीर तानाजी मालुसरे यांची नेमणुक करतात. तर मोघलांनी किल्लेदार उदयभान राठोड यांची नेमणुक केली जाते. दरम्यान कोंढाणा जिंकण्यासाठी राजमाता जिजाऊंनी घेतलेला पण देखील दाखवण्यात आला आहे. तसेच उदयभान राठोड उर्फ सैफ अली खानच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले भव्य दिव्य सेट पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळाते होते.