‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट उत्तर प्रदेश आणि हरयाणापाठोपाठ महाराष्ट्रातदेखील करमुक्त करावा अशी मागणी गेल्या काही दिवासांपासून केली जात होती. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात चित्रपटातील मुख्य भूमिकेतील अभिनेता अजय देवगणने ट्विट केले आहे.

अजयने ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिग्दर्शक ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ओम राऊत यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यांचा हा पहिलावहिलाच चित्रपट हिट होत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबतच सैफ अली खान आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसत आहे. प्रदर्शनाच्या दहा दिवसांमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची कमाई केली आहे.