प्रदर्शनाच्या दहा दिवसांनंतरही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट पाहण्यासाठी तिकिटबारीवर प्रेक्षकांची गर्दी अजूनही पाहायला मिळतेय. या दहा दिवसांत चित्रपटाने कमाईचा तब्बल १५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. दहाव्या दिवशी, म्हणजेच प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्याअखेर ‘तान्हाजी’ने २२.१२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची दहा दिवसांची एकूण कमाई १६७.४५ कोटी रुपये इतकी झाली आहे.

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा एक वेगळाच आलेख रचला आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ५० कोटी, सहाव्या दिवशी १०० कोटी, आठव्या दिवशी १२५ कोटी तर दहाव्या दिवशी १५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ‘गोलमाल अगेन’नंतर हा अजय देवगणचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. तर काजोल आणि सैफ अली खान यांच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. तिसऱ्या आठवड्यात २०० कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने वर्तवली आहे. तसे झाल्यास २०२० या नवीन वर्षात २०० कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरेल.

‘तान्हाजी’ या चित्रपटा तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. अभिनेता अजय देवगणने तान्हाजींची भूमिका साकारली असून सैफ अली खानने उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे. तर काजोल तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात देवदत्त नागे, शदर केळकर, अजिंक्य देव यांसारखे मराठी कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.