‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या ऐतिहासिकपटाने सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या दिवशी अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने १०७.६८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. केवळ शनिवार-रविवारच नाही तर आठवड्याच्या सुरुवातीलाही चित्रपटाच्या कमाईचा आकडा वरचढ राहिला.

‘तान्हाजी’सोबतच दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र ‘छपाक’ने सहा दिवसांत केवळ २६.५३ कोटी रुपयेच कमावले आहेत. तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा भव्यदिव्य रुपात मांडण्यात दिग्दर्शक ओम राऊत यांना हिंदीतील पदार्पणात यश मिळाले आहे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यांमध्ये चांगली कमाई केली आहे. नुकताच हा चित्रपट उत्तर प्रदेश आणि हरयाणामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

थ्रीडी तंत्रज्ञानात तयार झालेला हा ऐतिहासिकपट आणि जोडीला अजय देवगण, काजोल, सैफ अली खानसारखे हिंदीत ग्लॅमरस म्हणून यशस्वी ठरलेले मोठे चेहरे. या सगळ्यांचा समतोल साधत कुठेही हे चेहरे मराठेशाहीच्या इतिहासापेक्षा मोठे ठरणार नाहीत, इतक्या संयत पध्दतीने दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ची मांडणी केली आहे.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ची कमाई

शुक्रवार- १५.१० कोटी रुपये
शनिवार- २०.५७ कोटी रुपये
रविवार- २६.२६ कोटी रुपये
सोमवार- १३.७५ कोटी रुपये
मंगळवार- १५.२८ कोटी रुपये
बुधवार- १६.७२ कोटी रुपये