छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या स्वप्नामध्ये अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक असणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात नुकतीच मोठ्या पडद्यावर मांडली. दिग्दर्शक ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून दणक्यात हिंदीमध्ये पदार्पण केलं आहे. केवळ तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने ६० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये समाविष्ट होईल हे सांगण्याची वेगळी गरज नाही. मात्र एकीकडे या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलले जात असतानाच दुसरीकडे या चित्रपटामध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी किती मानधन घेतले आहे याची आकडेवारी समोर आली आहे.

सैफ अली खानला मिळाले इतके कोटी


अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यांमध्ये चांगली कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खानने राजपूत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधूनच आपल्या भूमिकेशी सैफने न्याय केल्याच्या चर्चा सुरु झाला. या नकारात्मक भूमिकेसाठी सैफला चक्क सात कोटी रुपये मानधन देण्यात आल्याचे समजते.

काजोल किती मानधन मिळालं?

अजय देवगणचा शंभरावा चित्रपट असणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मध्ये त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीने म्हणजेच काजोलनेच पदड्यावरही पत्नीची (सावित्रीबाई मालुसरे यांची) भूमिका साकारली आहे. या दोघांची चित्रपटातील कमेस्ट्रीची झलक ट्रेलरमध्ये दिसून आली. १९९९ साली लग्नाच्या बेडीत अडकलेल्या अजय आणि काजोलने याआधी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये प्रमुख्याने ‘इश्क’, ‘प्यार तो हो ना ही था’, ‘राजू चाचा’, ‘गुंडाराज’, ‘हाल-ए-दिल’, ‘विघ्नहर्ता’, ‘यू मी और हम’, ‘हलचल’, ‘दिल क्या करे’ या चित्रपटांचा समावेश आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘टूनपूर का सुपरहिरो’ या चित्रपटामध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. आता तान्हाजीच्या माध्यमातून पुन्हा हे दोघे जवळजवळ एका दशकानंतर एकत्र काम करत आहेत. या चित्रपटासाठी काजोलला पाच कोटींचे मानधन देण्यात आले आहे.

अजय देवगणला मिळाले सर्वाधिक मानधन


प्रमुख भूमिका साकारणारा अजय देवगणच या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी १५.१० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर शनिवारी २०.५७ कोटी रुपये आणि रविवारी २६.०८ कोटी रुपये कमावले. आता अजयला या चित्रपटासाठी किती मानधन देण्यात आलं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. तर एका वृत्तानुसार सहनिर्माता असलेल्या अजयला या चित्रपटासाठी एकूण ३० कोटींचे मानधन मिळणार आहे.