ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटावरून एक नवा वाद सुरु झाला आहे. या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंबद्दल चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप गोडवलीच्या गावकऱ्यांनी केला आहे. चित्रपटात तान्हाजी यांचे मूळ गाव असलेल्या गोडवलीचा उल्लेख नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चित्रपटात तान्हाजींचे जन्मगाव गोडवली दुर्लक्षित राहिल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. ओम राऊत यांनी चित्रपटाची निर्मिती करताना आम्हाला गावाच्या उल्लेखाविषयी शब्द दिला होता. परंतु, चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यात कुठेही हा उल्लेख नाही, असे गावकरी म्हणाले. याविषयी गोडवली ग्रामस्थांनी निर्माते-दिग्दर्शकांना पत्र लिहिले असून त्यावर सकारात्मक उत्तर न आल्यास आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Video : ‘तान्हाजी’मधील हे दृश्य साकारणं होतं सर्वांत अवघड- ओम राऊत

एकीकडे चित्रपटगृहात ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत असताना दुसरीकडे हा नवा वाद निर्माण झाला आहे. यावर दिग्दर्शक व निर्माते काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘तान्हाजी’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगणने तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. तर सैफ अली खान उदयभान राठोडच्या भूमिकेत आहे. केवळ दहा दिवसांत या चित्रपटाने कमाईचा १५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.