बहुचर्चित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. शिवाजी महाराजांच्या इतिहासात आपण तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा अनेकदा वाचली आहे. हा अनोखा पराक्रम आता एका मराठमोळ्या दिग्दर्शकाने रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ओम राउत या मराठी दिग्दर्शकाने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’चे दिग्दर्शन केले आहे. खरं तर ओमने दिग्दर्शित केलेला हा दुसराच चित्रपट आहे. परंतु या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी त्याच्या दिग्दर्शन शैलीचे तोंड भरुन कौतुक केले. त्याने याआधी लोकमान्य टिळकांच्या आयुष्यावर आधारित ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तसेच महेश मांजरेकर यांच्या ‘लालबाग परळ’ व महेश भट यांच्या ‘हॉन्टेड 3D’ या चित्रपटांचा तो सहनिर्माता होता. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण मुंबईमध्येच केले गेले आहे. या चित्रपटात स्पेशल ईफेक्टचा प्रचंड वापर करण्यात आला आहे.

आणखी वाचा- Tanhaji The Unsung Warrior : कोंढाण्यावर ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, तुम्हाला माहिती आहे?

या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वटवणार आहेत.