उत्तर प्रदेश आणि हरयाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या चित्रपटाला टॅक्स फ्री केलं जावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यासंदर्भात पत्रसुद्धा लिहिलं होतं. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं होतं, “तान्हाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.” अखेर जनतेच्या आग्रहाखातर सरकारने हा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त केला आहे.

Video : ‘तान्हाजी’मधील हे दृश्य साकारणं होतं सर्वांत अवघड- ओम राऊत

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या स्वप्नामध्ये अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक असणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजीच्या माध्यमातून दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफ अली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत. केवळ दहा दिवसांत या चित्रपटाने कमाईचा १५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.