हिंदी ‘औरंगजेब’ने हिरावून घेतलेला मल्टिप्लेक्स खेळांचा घास अखेर मराठी ‘तानी’च्या मुखी पडला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने मल्टिप्लेक्स चालकांना ‘आपल्या पद्धती’ने समज दिल्यामुळे आता १४ मल्टिप्लेक्समध्ये ‘तानी’ झळकला आहे.  गेल्या शुक्रवारी हिंदीत प्रदर्शित झालेल्या ‘औरंगजेब’मुळे ‘तानी’या चित्रपटाला मल्टिप्लेक्सचे दरवाजे बंद झाले होते. ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम या प्रश्नाला वाचा फोडली होती. मल्टिप्लेक्सच्या या मोगलाईविरुद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्यांनी शिवसेनेच्या चित्रपट सेनेकडे धाव घेतली होती. शिवसेना चित्रपट सेनेने आपल्या बदललेल्या ‘सामोपचारी’ कार्यपद्धतीप्रमाणे रीतसर मल्टिप्लेक्स मालकांना निवेदन दिले. मल्टिप्लेक्स मालकांनीही त्यावर ‘तानी’ला जागा देण्याचे आश्वासन देऊन बोळवण केली आणि प्रत्यक्षात आठ मल्टिप्लेक्समध्ये एक एक खेळ मागितला असताना एकाच मल्टिप्लेक्समध्ये खेळ देऊ केले.
दरम्यान, या प्रकरणी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ‘मनचिसे’ अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हा विषय आपण हाती घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी व उपाध्यक्ष सतीश बाविसकर आणि शशांक नागवेकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांची भेट घेतली. ‘तानी’ला योग्य वेळ आणि योग्य खेळ न दिल्यास ‘खळ्ळ ऽऽखटॅक’ स्टाइलने आंदोलन केले जाईल, अशी समजही दिली गेली. त्यानंतर लगेचच मल्टिप्लेक्स चालकांनी १४ मल्टिप्लेसमध्ये ‘तानी’चे खेळ लावले.