उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामुहिक बलात्कार पीडित १९ वर्षीय दलित तरुणी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाचं वातावरण पसरलं असून अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यातच मराठी कलाविश्वासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे. यामध्येच महिल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनेदेखील संताप व्यक्त केला आहे. तसंच हे सारं राजकारणासाठी आणि खुर्चीसाठी होत असल्याची तनुश्री म्हणाली आहे. असं  ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून तनुश्री अमेरिकेमध्ये होती. मात्र, भारतात परतल्यानंतर तिने हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सोबतच तिने दु:खी व्यक्त केलं आहे. “हाथरससारखी घटना पुन्हा घडायला नको यासाठी यामागचं मूळ कारण आपण शोधायला हवं. देशातील तरुणवर्ग, मुल यांच्यामधील राक्षसीवृत्ती, हिंसा का वाढत चालली आहे, यामागचं कारण आपल्याला जाणून घ्यायला हवं. खरंतर स्त्रीयांचं रक्षण करता यावं यासाठी पुरुषांना देवाने जास्त ताकद दिली आहे. मात्र, इथे स्त्रीयांचं रक्षण करण्याऐवजी तेच त्यांचे भक्षक होत आहेत. तसं पाहायला गेलं तर या घटनांमागे एक समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत”, असं तनुश्री म्हणाली.

वाचा : हाथरस : ‘तू बोलू नयेस म्हणून…’; प्रियदर्शन जाधव संतापला, आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची केली मागणी

पुढे ती म्हणते, “कोणत्याही स्त्रीवर अन्याय, अत्याचार होत असेल तर आपण आवाज उठवला पाहिजे. अशा घटना घडल्या की सोशल मीडियावर काही काळासाठी विविध मोहिमा सुरु होतात. मात्र, ठराविक काळानंतर त्या बंद होतात. तसंच या सगळ्या परिस्थितीमध्ये काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी आणि खासकरुन राजकारणासाठी या सगळ्याचा वापर करतात”.

वाचा : ‘तिच्या शेवटच्या आठवणी…’; सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अर्जुन रामपाल व्यक्त

नेमकं काय आहे प्रकरण?

दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणेच उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे सामुहिक बलात्काराची घटना घडली. चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ कापली आणि तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.