राखी सावंत आणि तनुश्री दत्ता हा वाद आता सर्वांनाच परिचयाचा झाला आहे. मीटु मोहिमेपासून सुरू झालेला हा वाद आजतागायत कायम आहे. आता तिनं तनुश्रीवर आणखी एक आरोप केला आहे. नुकतंच एका स्पर्धेदरम्यान महिला कुस्तीपटूनं राखीला उचलून आदळलं. त्यामुळे दुखापत झालेल्या राखीला रुग्णालय गाठावं लागलं. मात्र याला केवळ आणि केवळ तनुश्री दत्ताच कारणीभूत असून तिनंच कुस्तीपटूला मला मारण्याची सुपारी दिली असा दावा राखीनं केला आहे.

हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राखीने विजयी महिला कुस्तीपटूला आव्हान देत तिच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या रैवलननं राखीला हवेत उचलून जमीनीवर आदळलं.

या घटनेनंतर राखीनं रुग्णालयात धाव घेतली. ती पूर्णपणे बरी असल्याचं डॉक्टरांचं जरी म्हणणं असलं तरी राखीनं मात्र आपल्यावर ही परिस्थिती तनुश्रीमुळे ओढावली असल्याचा दावा केला आहे. मी कुस्तीपटूला आव्हान दिलं नाही, मी डान्स करत होते तेव्हा तिनं मला उचलून आदळलं यामागे तनुश्रीचा हात आहे, यासाठी तनुश्रीनं कुस्तीपटूला भरपूर पैसे दिले होते असं राखीचं म्हणणं आहे.