अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तनुश्री दत्तावर ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर यांनी पलटवार केला. चॉकलेट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तनुश्रीला कोणीही कपडे काढायला सांगितले नव्हते. तनुश्री माध्यमांना चुकीची माहिती देत असून माध्यमांनीही तिच्या विधानांना प्रसिद्धी देताना विचार केला पाहिजे, असे गझमेर यांनी म्हटले आहे.
नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर तनुश्री दत्ताने चॉकलेट या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावरही गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. २००५ मध्ये ‘चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपडे काढून डान्स करायला सांगितले होते, असा आरोप तिने केला होता. यावर या चित्रपटाचे सहायक्क दिग्दर्शक गझमेर यांनी फेसबुकवरील पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली.
‘चॉकलेट’ या चित्रपटात अगोदर बिपाशा बासूची निवड झाली होती. मात्र, तारखांच्या अडचणींमुळे बिपाशाऐवजी तनुश्रीची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली. तनुश्रीची शिफारस मीच केली होती. तनुश्री नवखी होती. तिला सेटवर काहीच कळायचे नाही. त्यामुळे आमच्या टीमने सुरुवातीला तनुश्रीला नकार दिला. पण मी तनुश्रीची निवड योग्य ठरेल असे सांगितले होते. शेवटी माझ्या शब्दाखातर विवेक अग्निहोत्रींनी तनुश्रीची ऑडिशन घेतली आणि या चित्रपटात तिची निवड झाली. तनुश्रीला अभिनयात मदत मिळावी यासाठी विवेक अग्निहोत्री यांनी त्यांची पत्नी पल्लवी यांना पाचारण केले होते. तनुश्रीला तांत्रिक बाबींचे आणि अभिनयाचे प्रशिक्षण देण्याची धूरा पल्लवींजींकडे होती. तनुश्रीचे मूड स्विंग होतात, याची मला कल्पना होती. मात्र चित्रिकरणादरम्यान ती अनेकदा तिच्या कारमध्येच बसून राहायची, ती असं का वागायची आणि इतका वेळ ती कारमध्ये काय करायची ही तिलाच माहिती, असे गझमेर यांनी म्हटले आहे.
तनुश्रीने ज्या गाण्याच्या चित्रीकरणावरुन हा आरोप केला त्याबाबत गझमेर म्हणाले, चित्रीकरणादरम्यान तनुश्रीचा गैरसमज झालेला. तिला कोणीही कपडे काढायला सांगितले नव्हते. २०० लोक सेटवर असताना असं सांगण्याची हिंमत तरी कोण करेल का?, तनुश्री माध्यमांना चुकीची माहिती देत असून माध्यमांनीही विचार करुन तिच्या विधानांवर बातमी करावी, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 4, 2018 10:05 am