प्रसिद्धीसाठी तनुश्री दत्ता विनाकारण आरोप करत आहे. नानावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. तसेच या सर्व प्रकरणामध्ये मनसेचाही काहीही संबंध नाही. राज ठाकरेंचे नाव का घेतले हे अद्याप समजले नाही. दहा वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तनुश्रीने हा खटाटोप केला आहे. एखाद्या जनसंपर्क अधिकाऱ्याने तिला ही आयडिया दिली असेल. चित्रपटाच्या सेटवर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा खुलासा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी केला आहे.

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सारंग यांनी तनुश्रीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राकेश सारंग ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाचे दिगदर्शक आहेत. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर, राकेश सारंग आणि गणेश आचार्य यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले होते असा आरोप तिने केला होता.

राकेश सारंग काय म्हणाले – 

आयटम साँगसाठी आम्ही फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये मोठा सेट उभारला होता. एकूण तीन दिवसांचे गाणे चित्रित करायचे होते. या आयटम साँगसाठी २५० डान्सर आणि ५०० पेक्षा अधिक लोक होते. गाण्याच्या पहिल्या दिवशी फक्त तनुश्री दत्ताला बोलवण्यात आले होते. पहिल्या दिवशी चित्रीकरण व्यवस्थित झाले. पहिल्या दिवशीही लोकांनी गर्दी केली होती. मी स्वत: गर्दीला बाजूला केले होते. दुसऱ्या दिवशी नाना पाटेकर चित्रीकरणासाठी आले. त्यावेळीही गर्दीने गोंधळ घातला. दुसऱ्या दिवशीही चित्रीकरण व्यवस्थित झाले. सेटवर एकूणच हलकेफुलके वातावरण होते. त्यामुळे आम्हीही खूश होतो. त्यावेळी माझ्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. नुकतेच प्लास्टर काढले होते. त्यामुळे मी एकाच जागी बसून होतो. फार हालचाल करायचो नाही. असे सारंग म्हणाले.

तिसऱ्या दिवशी तनुश्री चित्रीकरणासाठी आली त्यावेळी तिचा मूड व्यवस्थित वाटत नव्हता. ती कोणालाही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हती. तिचा चेहरा सुजलेला होता. डोळेही लाल झाले होते. मी ज्यावेळी तिची भेट घेण्यासाठी गेलो, त्यावेळी तनुश्री दत्ताने नानाबाबत अर्वाच्य शब्दात टिप्पणी केली. मी बोलू शकत नाही, अशा शब्दांत ती नानाबद्दल बोलत होते. काही वेळानंतर तिने चित्रीकरणास नकार दिला. सेटवर येऊन मी माझ्या सहायकांना विचारले, की इथे काही वादावादी झाली का? तर ते नाही म्हणाले. नानाने आपल्याला स्पर्श केल्याचे तिने नंतर सांगितले. त्यामुळे आधी मला वाटले भांडण झाले असेल. नाना मस्करीत काहीतरी बोलला असेल आणि वाद झाले असतील.

त्यानंतर का नकार दिला म्हणून विचारण्यासाठी व्हॅनकडे गेलो. त्यावेळी ती दार उघडत नव्हती. सर्वांनी प्रयत्न केला. चार तास आम्ही व्हॅनचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला. ‘अखेर ती बाहेर आली. मै जा रही हू, मुझे करना नही है, असे म्हणत ती निघून गेली. आम्ही पत्रकारांना बोलावले नव्हते, पण त्यांना कुठून तरी समजले. २००८मध्ये दीड कोटी रुपये खर्च करुन आयटम डान्स करणे मोठी गोष्ट होती. मी माध्यमांना मुलाखत दिली नाही, गणेशनेही दिली नाही. असेही सारंग म्हणाले.

पत्रकारांना नानाबरोबर तनुश्री काम करणार नसल्याची बातमी समजली. त्यानंतर पत्रकारांनी प्रश्नांसाठी तनुश्रीला घेराव घेतला. यामध्ये तनुश्री आणि पत्रकारामध्ये बाचाबाची झाली. तनुश्री दत्तच्या गाडीखाली कॅमेरा मॅनचा पाय गेल्यामुळे दुखापत झाली. त्यानंतर पत्रकारांचा राग अनावर झाला होता. त्यानंतर कॅमेरामॅनने तनुश्रीची गाडी फोडली. हे सर्व झाले तरी आम्ही नानाला या बद्दल काही सांगितले नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी आम्ही नानाला याबद्दल सांगितले. तनुश्री दत्ताने तुमच्याबरोबर काम करण्यास नकार दिला आहे. नानाने दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नानांच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती माझ्या मुलीसारखी आहे, असे का आरोप करतेय समजत नाही. असे स्पष्टीकरण दिले होते. तनुश्री दत्ता खोटे बोलत आहे. नाना पाटेकर यांनी असे काही केले नव्हते.

आम्ही नंतर तिच्याशी संपर्क साधला. निर्मात्याने तिच्याविरोधात ‘सिन्टा’ या असोसिएशनमध्ये तक्रार केली. नुकसान मागितले. त्या बैठकीला ती आलीही होती. तिने आपली एकही फ्रेम वापरायची नाही, असे सांगत पाच लाख रुपये मागितले. आम्ही दिले, असेही राकेश सारंग म्हणाले. मुळात ही घटना घडल्याचा दावा ती करते, तेव्हा चारशे पाचशे लोकांची गर्दी  होती. इतक्या जणांसमोर कोणी गैरवर्तन करेल का? नानाने तिच्या गालाला स्पर्श करता येईल, अशी स्टेप अॅड केल्याचा तिने केलेला दावाही खोटा आहे. मनसेचा या घटनेशी मुळात काहीच संबंध नाही. जो नाना कधीच कोणाला घाबरला नाही, तो राज ठाकरेंना फोन करुन सांगेल का, की तुझे गुंड पाठव? असे सवाल उपस्थित करत तनुश्री हे निव्वळ प्रसिद्धीसाठी करत असल्याचा दावाही राकेश सारंग यांनी केला.

नानाची कायदेशीर लढाई –

गैरवर्तणुकीचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताला नाना पाटेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी या वृत्ताला दुजारा दिला आहे. ‘तनुश्रीने केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून तिने खोटी माहिती पुरवली आहे. तिने केलेल्या आरोपांमुळे नाना पाटेकरची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे तनुश्रीने जाहीर माफी मागावी असे नमूद करण्यात आलेली कायदेशीर नोटीस तनुश्रीला पाठविण्यात आल्याचे राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले आहे.प्रसार माध्यमांशी बोलताना शिरोडकर म्हणाले की, याबाबत आपण आता काही बोलू शकत नाही. पण तनुश्री असे का करते याची कल्पना नाही. नाना पाटेकर लवकरच मुंबईमध्ये येणार आहेत. ते मुंबईमध्ये आल्यावर पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर बोलतीलच.

 काय आहे प्रकरण –
अमेरिकेहून नुकत्याच भारतात परतलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. #metoo मोहिमेबद्दल बोलताना तिने नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केले. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने मुलाखतीत केला होता. नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इण्डस्ट्रीतल्या सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असे तनुश्रीने ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. असभ्य वर्तन करणाऱ्या नानाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांना गुंडांकरवी धमकावल्याचा आरोपही तिने केला होता.