अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर शूटिंगदरम्यान असभ्य वर्तन केल्याचे आरोप केल्यानंतर अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. काहींनी हा केवळ पब्लिसिटी स्टंड आहे असं म्हणत तनुश्रीवर टीका केली. तर अनेक कलाकारांनी तिला पाठिंबासुद्धा दिला. ही घटना दहा वर्षांपूर्वी २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडल्याचं तनुश्रीने सांगितलं. आता दहा वर्षांनी अमेरिकेहून परतल्यानंतर एका मुलाखतीत #MeToo मोहिमेबद्दल बोलताना तनुश्रीने पुन्हा नाना पाटेकरांचा विषय काढला. हे सर्व आरोप तिने प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी, ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश मिळवण्यासाठी केला अशीही टीका तिच्यावर झाली. तनुश्रीने या टीकांना आता सडेतोड उत्तर दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘बिग बॉससाठी मी दहा वर्षांनंतर हा विषय पुन्हा नव्याने उकरून काढला असं म्हटलं जातं आहे. पण ही टीका केवळ मला अपमानित करण्यासाठी केली जात आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करणं म्हणजे माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. ते काही माझं स्वप्न आहे. तुम्हाला काय वाटतं, सलमान खान देव आहे आणि बिग बॉस हे स्वर्ग आहे? मला असं काहीच वाटत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून बिग बॉसमध्ये येण्यासाठी मला कोटींची ऑफर दिली जात आहे. पण मीच त्यांना नकार देते.’

‘बिग बॉस’चं बारावं पर्व नुकतंच सुरू झालं आणि चर्चेत असलेल्या व्यक्तींना या शोमध्ये बोलावलं जातं. त्यामुळे तनुश्रीनेसुद्धा बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवण्यासाठी नाना पाटेकरांवर आरोप केले असं म्हटलं जात आहे. दरम्यान तनुश्रीने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माता सामी सिद्दीकी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नाना पाटेकर या आरोपांवर आपली बाजू मांडण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेणार होते. पण काही कारणास्तव त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केली.