‘टपाल’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच जुन्या काळाची सफर घडवून आणणारा चित्रपट आहे हे सहज लक्षात येते. १९७०च्या दशकातील ग्रामीण महाराष्ट्राचा काळ दाखविण्यात आलेल्या या चित्रपटात पत्राची आणि पर्यायाने पोस्टमनची आतुरतेने वाट पाहणारा समाज, प्रियजनांची पत्रानेच ख्यालीखुशाली कळण्याच्या दिवसांत पोस्टमन, पोस्टमास्तरविषयी सर्वच लोकांना असलेला जिव्हाळा याचे चित्रण या चित्रपटात अप्रतिम करण्यात आले आहे. यापूर्वीही पोस्टमनशी संबंधित चित्रण हिंदी चित्रपटातून येऊन गेले असून त्या पलीकडे जाऊन दिग्दर्शकाने पोस्टमनच्या खासगी आयुष्यातील शल्य आणि एका निरागस मुलाची पत्र पाठवून झालेली गंमत अशा दोन गोष्टींची उत्तम गुंफण करीत दिग्दर्शकाने मानवी शल्य, निरागसता भावनिक पदर उलगडत अप्रतिमरीत्या चित्रपट साकारला आहे.
करमणूक करणारा परंतु आशयघन मराठी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मंगेश हाडवळे यांची पटकथा असलेल्या ‘टपाल’ या चित्रपटाद्वारे हिंदीतील छायालेखक लक्ष्मण उतेकर प्रथमच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर आले आहेत.
रंगा हा दहा-बारा वर्षांचा खोडकर मुलगा. त्याचे शाळेपेक्षा बाहेर भटकणे, हुंदडणे, खोडय़ा करणे याकडेच जास्त लक्ष. अवखळ, अल्लड वयातील रंगाला त्याच्याच वर्गातील कूकी ही मुलगी आवडते, तिच्याकडे सतत पाहात राहणे हा त्याचा आवडता छंदच बनलाय. रंगाचा कूकीवर जीव जडलाय. म्हणून तो एक दिवस तिला पत्र लिहितो आणि ते पत्र पत्रपेटीत टाकतो. परंतु, नंतर अशा काही गोष्टी घडतात की गावचे पोस्टमन देवराम मास्तरांना सांगून कूकीला पत्र पोहोचू नये अशी खटपट रंगा करतो. निपुत्रिक असल्यामुळे पोष्टमन देवराम मास्तर आणि खासकरून त्यांची पत्नी तुळसा यांचाही रंगावर जीव आहे. मुलाप्रमाणे त्याला घरी बोलावून खाऊ घालणे, त्याच्यावर माया करणे असे तुळसा करते. एकीकडे पत्र परत मिळावे म्हणून रंगाची खटपट आणि देवराम मास्तर व त्यांची पत्नी तुळसा यांचे आयुष्य आणि त्यातील घटना यांची बेमालूम सरमिसळ करीत चित्रपट पडद्यावर साकारतो.
रंगाचा अवखळ, अल्लडपणा, खोडकरपणा, त्याचे अल्लड वयातील कूकीवरचे प्रेम, तिच्यासमोर छान दिसण्यासाठी त्याची चाललेली खटपट, प्रसंगी त्यासाठी मारुतीच्या देवळातील रुपया ढापणे यातून निरागसतेची झलक दिग्दर्शकाने दाखवली आहे. रोहित उतेकर या बालकलाकाराने उत्तमपैकी रंगा साकारला आहे. तुळसाच्या भूमिकेतील वीणा जामकर आणि देवराम मास्तरच्या भूमिकेतील नंदू माधव यांनी नेहमीप्रमाणे व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत. जयवंत वाडकर यांनीही पाटीलच्या छोटय़ाशा भूमिकेद्वारे आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्या जोडीला सुहास शिरसाट, पुंडलिक धुमाळ, मिलिंद गुणाजी यांच्यासारख्या कलावंतांनीही आपापले काम चोख केले आहे. लावणीद्वारे ऊर्मिला कानेटकरनेही नृत्याभिनय कौशल्याची झलक चांगली दाखवली आहे.
दोन वेगवेगळ्या गोष्टींची गुंफण करताना चित्रपटाचे दोन भाग पडत असले तरीही अपेक्षित परिणाम करून निव्वळ निरागस विनोदी नव्हे तर गंभीर वळणावर नेऊन प्रेक्षकाला अंतर्मुख करण्यात पटकथाकार नक्कीच यशस्वी झाला आहे. कथनशैली आणि १९७०च्या काळातील गावाचे उत्तम चित्रण, अनेकदा चित्रचौकटींद्वारे भाव पोहोचविण्याचे कसब दिग्दर्शकाने दाखविले आहे.
सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात चित्रपट नक्कीच यशस्वी झाला आहे. उत्तम छायाचित्रण, उत्तम अभिनय, अचूक पात्रनिवड आणि दोन गोष्टींचे मिश्रण करून एकाच वेळी नर्मविनोदी तरी गंभीर प्रकारचा चित्रपट बनविता येऊ शकतो याचे दर्शन हा चित्रपट घडवितो. हे टपाल देखणे, भावनिक आहे.
मंगेश हाडवळे प्रस्तुत
‘टपाल’
निर्माती- वर्षां मधुसूदन सत्पाळकर
छायालेखक-दिग्दर्शक- लक्ष्मण उतेकर
पटकथा व क्रिएटिव्ह निर्माता- मंगेश हाडवळे
संवाद- लक्ष्मण उतेकर
संगीत- रोहित नागभिडे
संकलन- के. डी. दिलीप
कलावंत- वीणा जामकर, नंदू माधव, जयंवत वाडकर, रोहित उतेकर, ऊर्मिला कानेटकर, मिलिंद गुणाजी, नंदू गाडगीळ, सुहास शिरसाट, पुंडलिक धुमाळ, गंगा गोगावले व अन्य.