मराठी कथा, कादंबरी यावर आधारित असलेले चित्रपट यापूर्वीही येऊन गेले. आणि कादंबरीवरचे चित्रपट काही अपवाद वगळता प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतात हेही दिसून आले आहे. आगामी मराठी चित्रपट ‘तप्तपदी’च्या निमित्ताने रवींद्रनाथ टागोर यांची कथा पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे. टागोर यांच्या ‘दृष्टिदान’ या कथेवर हा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन सचिन नागरमोजे यांचे आहे.
‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून प्रेक्षकांपुढे आलेल्या कश्यप परुळेकरचा हा पहिलाच चित्रपट आहे. वेगळे काही तरी करायचे, हे मी ठरविले होते. त्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट एक वेगळा अनुभव होता, असे कश्यप म्हणाला. कश्यपबरोबर या चित्रपटात तीन अभिनेत्री आहेत. नीना कुलकर्णी यांचा या चित्रपटातील वावर हा खास वेगळा आणि अनुभवी असा आहे.
चित्रपट किंवा नाटकात भूमिका करण्यापूर्वी त्यात वेगळेपण काय आहे, ते मी नेहमी शोधत असते. ‘तप्तपदी’मधील माझी भूमिका छोटी असली तरी ती मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचे नीना कुलकर्णी म्हणाल्या. तर ‘राधा ही बावरी’मुळे घराघरात पोहोचलेली श्रुती मराठेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबाबत मलाही उत्सुकता असून प्रेक्षक त्याचे स्वागत कसे करतील त्याचाच विचार करते आहे, असे श्रुतीने सांगितले. सक्षम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीणा जामकरनेही नाजूक नातेसंबंध आणि प्रेमाची शाश्वत मूल्ये यांचे कंगोरे, त्यातील संघर्ष यात पाहायला मिळेल, असे सांगितले.
निर्माते हेमंत भावसार यांनी सांगितले की, कथा ऐकल्यानंतर यावर चित्रपट होऊ शकतो हे आमच्या लक्षात आले. आमच्या सततच्या बैठका आणि चर्चेतून चित्रपट तयार झाला. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच वेगळे समाधान मिळेल. तर दिग्दर्शक सचिन नागरमोजे म्हणाला की, प्रेमाच्या नात्याची एक वेगळी अनुभूती आम्ही मांडली आहे. मानवी नातेसंबंध, भावभावना, वास्तवता आणि या सगळ्यातील संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.