अभिनेत्री तारा सुतारियाने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तारासोबत टायगर श्रॉफ व अनन्या पांडे हेही कलाकार होते. नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या अभिनेत्रीने घराणेशाहीविषयी तिची मतं सांगितली.

घराणेशाही आपल्या देशात इतर अनेक क्षेत्रांत नांदते आहे तशीच ती बॉलिवूडमध्ये गेली अनेक वर्ष मूळ धरून आहे. बॉलिवूडमध्ये गॉडफादर, स्टार किड्स या गोष्टी पूर्वीपासूनच प्रचलित आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर नेहमीच घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित होतो. पण, ताराच्या कुटुंबीयांचा सिनेसृष्टीशी काही संबंध नव्हता. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी या क्षेत्राशी निगडित नव्हती. तरीही स्वतःच्या कौशल्यावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. घराणेशाहीविषयी बोलताना ती म्हणाली की,”मला वैयक्तिक पातळीवर या गोष्टीचा कोणताही त्रास झाला नाही. मला या क्षेत्रात कोणीच वेगळे वागवले नाही. घराणेशाहीबाबत कायमच चर्चा होत असतात पण, माझ्या मते या चर्चा मूर्खपणाच्या आहेत. कारण, मला त्याच्यामुळे कधीच तोटा झालेला नाही.”

“बॉलिवूडमध्ये ‘बाहेरून आलेले कलाकार’ किंवा ‘परंपरेने आलेले कलाकार’ हे टॅग मला गोंधळात टाकतात. माझ्यामते, आपण अनेक प्रॉब्लेम्स स्वतःच तयार करतो. आता माझे तीन चित्रपट लागोपाठ येत आहेत. जर मला घराणेशाहीचा त्रास झाला असता, तर मला इतक्या लवकर तीन चित्रपट मिळालेच नसते.” असंही ती म्हणाली.

तारा व सिद्धार्थ मल्होत्रा ‘मरजावा’ चित्रपटात एकत्र काम करत आहेत. तमिळ सुपरहिट चित्रपट ‘RX 1००’ च्या हिंदी रिमेकमध्येही तारा झळकणार आहे.