ईद आणि सलमान खान यांच्या चित्रपटांमध्ये जणू एक समीकरण झालं होतं. त्यामुळे आतापर्यंत प्रत्येक वर्षी सलमानचा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. मात्र यंदा २०१९ मध्ये सलमानच्या चित्रपटांना मागे टाकत शाहिद खानच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केल्याचं पाहायला मिळालं. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतीच २०१९ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या यादीनुसार, शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बाजी मारली आहे.

तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या यादीनुसार यावेळी कमाईच्या बाबतीत ‘कबीर सिंग’ हा प्रथम स्थानावर आहे. त्या खालोखाल ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ दुसऱ्या स्थानावर, ‘भारत’ तिसऱ्या स्थानावर , ‘मिशन मंगल’ चौथा क्रमांक आणि ‘केसरी’ पाचव्या क्रमांकावर आहे. ‘टोटल धमाल’ सहाव्या स्थानावर, ‘सुपर 30’ सातव्या स्थानी आणि ‘गली बॉय’, ‘दे दे प्यार दे’, ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ हे चित्रपट अनुक्रमे आठ,नऊ आणि दहाव्या स्थानावर आहेत. त्यामुळे ‘कबीर सिंग’ हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा आणि तितकाच लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.

वाचा :  पाकिस्तानच्या लष्कर प्रवक्त्यांचा शाहरुख खानला अजब सल्ला

दरम्यान, ‘कबीर सिंग’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’मध्ये विजय देवरकोंडाने मुख्य भूमिका साकारली होती. तर ‘कबीर सिंग’मध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकला आहे. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केलं आहे.